मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून पोलीस उपायुक्त निमीत गोयल हे या पथकाचे प्रमुख असणार आहेत. तर या प्रकरणात आरोपी असलेल्या ५ पोलीस अधिकाऱ्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

बनावट गुन्हे दाखल करून खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक शामसुंदर अग्रवाल यांनी केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

याप्रकरणी संजय पुनामिया आणि सुनील जैन यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांकडे दाखल तक्रारीत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांची नावे समोर आली होती. त्यातील पठाण आणि कोरके यांनी पैसे घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची नायगाव येथील सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या (प्रकटीकरण डी-१) पोलीस उपायुक्त पदाचा कार्यभार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संगमनेरमध्ये अधिकाऱ्याची चौकशी

संगमनेर : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटींची वसुली करण्याचे लक्ष्य आपल्याला दिल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात  नाव आलेल्या संगमनेरातील एका अधिकाऱ्याच्या गावी सक्तवसुली संचालनालयाची तपास पथके दाखल झाली होती. तीन तास चौकशी करत जाबजबाब घेऊन ही पथके परतली.