मुंबईः साकीनाका येथील वास्तव्यास असलेल्या विवाहितने आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सासूशी झालेल्या भांडणावरून पतीने कानाखाली मारल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पती तिच्याकडे वारंवार हुंड्याची मागणी करून वाद घालत होता, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व कौटुंबिक हिसाचाराप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव ममता (२३) असून, २८ जून रोजी तिने साकीनाका येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ममताचे जून २०२४ मध्ये राजेश जोखाई प्रसाद मौर्य (३२) याच्याशी लग्न झाले होते. तो चालक आहे. ममताचा हा दुसरा विवाह होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर महिन्याभरातच सदनिका खरेदी करण्यासाठी मौर्य ममताला वडिलांकडून पैसे आणण्यास सांगत होता. त्यानंतर ममताच्या वडिलांनी मौर्यला ५ लाख रुपये दिले होते. मात्र मौर्य वारंवार पैशांची मागणी करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. ममताचा लहान भाऊ शुभम कुशवाहाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ममता जेव्हा गावातील कुटुंबीयांशी फोनवर बोलायची, तेव्हा ती पैशांची मागणी करायची आणि पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल माहिती द्यायची.
ममताने २८ जून रोजी आत्महत्या केली. पोलिसांनी तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली. तिचा भाऊ शुभम कांदिवलीत एका नातेवाइकासोबत राहतो. त्यामुळे सर्वप्रथम तो ममताच्या सासरी पोहोचला. त्यानंतर त्याला ममताला रुग्णलायात नेल्याचे समजले. त्यानुसार तो राजावाडी रुग्णालयात गेला. ममताचे त्याच्या आईशी भांडण झाले होते आणि त्यानंतर मी तिच्या कानाखाली मारली. त्यानंतर ममताने आत्महत्या केली, असे मौर्यने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शुभमच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी मौर्यविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ८० (हुंडाबळी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ममताचा मोबाइल तपासण्यात येत असून, तिच्या पालकांचे जबाबही लवकरच नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.