मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  दाखल गुह्यांतील रक्कम १० कोटीपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकारणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा नील यांना समन्स बजावले होते.

किरीट सोमय्या मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आर्थिक गुन्हे  शाखेत आले होते. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. सोमवारीही आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा जबाब नोंदवला होता. चार दिवस त्यांची चौकशी व जबाब नोंदवण्याची प्रक्रिया चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण तपासाला सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे सोमय्या यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.