scorecardresearch

प्रक्षोभक विधाने, कृत्यांवर गृह विभागाचे लक्ष ;  दिलीप वळसे पाटील यांचा भाजप-मनसेला इशारा

आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल प्रयत्न करत आहे.

दिलीप वळसे

मुंबई : मशिदीवरील भोंग्यासंदर्भात कर्नाटकात आंदोलन सुरू  झाले आहे. राज्यातील भाजप नेत्यांनीही या विषयावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा आणि समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे. प्रक्षोभक विधाने आणि कृत्यांवर राज्याची पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे, असा इशारा भाजप-मनसेला देत महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी गृह विभाग दक्ष असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही तो विषय घेत आक्रमक भूमिका जाहीर केल्यानंतर आता रमझान महिना सुरू झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर राज्यात अनुचित घटना घडणार नाही, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली. राज्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व पोलीस अधिकारी आपापल्या भागात योग्य ती काळजी घेत आहेत. आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल प्रयत्न करत आहे. जनतेनेही त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

ईडीच्या कारवाईमुळे सरकारला धोका नाही

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणल्याबाबत विचारले असता, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा चौकशी न करता ईडीकडून अशा प्रकारची कारवाई होत असेल तर केंद्र सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे हे आपल्याला लक्षात येते. तसेच कितीही कारवाई झाली तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.  हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

राऊतांच्या आरोपांवरच चौकशी पथक

संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील बिल्डरांना धमकावून पैसे उकळल्याचा आरोप करत काही कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून वीरेश प्रभू हे या एसआयटीच्या प्रमुखपदी आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. संजय राऊत यांच्यावरील कारवाई आणि एसआयटीच्या स्थापनेच्या योगायोगाबाबत विचारले असता, या एसआयटी स्थापनेची प्रक्रिया दोन दिवस आधीच झाल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police keeping close eye on provocative statements dilip walse patil zws