मुंबई : मुंबई पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर सामील झालेल्या अश्वदलाचा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वापर व्हावा, या दिशेने आता हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. अश्वदलासाठी सव्वा कोटीचा निधी तसेच ७० घोडेस्वार नियुक्त करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र या घोडेस्वारांच्या नियुक्तीसाठी पोलीस दलातील ७० पदे समर्पित करावी लागणार आहेत.

विद्यमान पोलीस आयुक्त देवेन भारती हे अश्वदल सक्रिय करण्यास उत्सुक आहेत. २०२० मध्ये हे अश्वदल पोलीस दलात नव्याने समाविष्ट करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात हे दल कार्यशील होते. १९३२ मध्ये हे अश्वदल वाढत्या वाहतुकीमुळे बंद करण्यात आले होते. हे दल कार्यान्वित करताना मरोळ येथे अडीच एकरवर तबेला तसेच घोड्यांसाठी जलतरण तलाव, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार होते. त्यापैकी अत्याधुनिक तबेला २०२३ मध्ये तयार करण्यात आला. याशिवाय पशुवैद्यकीय सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र घोडेस्वारांअभावी हे दल सक्रिय होऊ शकले नव्हते. प्रजासत्ताक दिन तसेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी परेडसाठी या दलाचा वापर केला जातो. मात्र या अश्वदलाचा विविध कामांसाठी वापर व्हावा, याचाही आता विचार सुरु झाला आहे.

मरोळ पोलीस वसाहतीतील मोकळ्या जागेत सुरुवातीला ३० अश्व तसेच एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक उपनिरीक्षक, चार हवालदार आणि ३२ शिपाई यांच्या मदतीने हे अश्वदल कार्यान्वित करण्यात आले. सध्या या अश्वदलात २२ घोडे आहेत. वर्षभरात त्यात आणखी घोड्यांची भर घालण्यात येणार आहेत. या दलासाठी घोडेस्वारी करता येणे आवश्यक आहे. मात्र सर्वच पोलिसांना ते शक्य नसल्यामुळे यासाठी स्वतंत्र घोडेस्वार असावेत, याची पोलिसांना जाणीव होऊ लागली. त्यातूनच पोलिसांची पदे समर्पित करुन घोडेस्वार नेमण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शासनाने त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उपनिरीक्षकाची दोन, सहायक उपनिरीक्षकाची चार यासह हवालदार (१६) आणि शिपायांची (४८) पदे शासनाला परत करण्यात आली आहेत. या पदांच्या मोबदल्यात घोडेस्वार नियुक्त करण्याची शासनाने मंजुरी दिली आहे.

गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची वाहने जाऊ शकत नाहीत. मोटरसायकलवरुन गस्त घालतानाही काही मर्यादा असतात. मात्र घोड्यावरुन गस्त घालणारा एक पोलीस उंचावरुन दूरपर्यंत नजर ठेवू शकतो. मुंबईत अशी गर्दीची अनेक ठिकाणे आहेत. तेथे हे दल उपयोगी पडणार आहे, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.