मुंबई : पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला गोळ्या घालण्याची व मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी दिल्यांनतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. हॉटेल मालकाने याबाबत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली.

पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदीप गाडे नावाच्या व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री दूरध्वनी केला. गाडे कोथरूडमधील इंदिरा नगर येथील रहिवासी असून त्यांच्या साताऱ्यातील हॉटेलमध्ये संदीप सिंह कामगार म्हणून कामाला होता. दोन दिवसांपूर्वी तो नोकरी सोडून निघून गेला. त्याने गाडे यांना दूरध्वनी करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मुंबईत ब्लास्ट करेन अशी धमकी दिली. या माहितीनंतर तात्काळ कोथरूड पोलिसांनी गाडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. नियमाप्रमाणे सर्व यंत्रणांना कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खोटी माहिती व धमक्यांमुळे पोलिसांवर ताण

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास आदी कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिस कॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले हे पडताळण्यासाठी त्यावर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.