मुंबई: अनधिकृतरित्या नामांकित कंपन्यांच्या नावे चपला आणि बूट तयार करणाऱ्या चेंबूरमधील एका कारखान्यावर पोलिसांनी रविवारी छापा टाकला. यावेळी कारखान्यातून तब्बल आठ लाख रुपये किमतीच्या चपला आणि बूट पोलिसांनी जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात चपला आणि बूट तयार करण्याचे कारखाने असून राजस्थान मधील रेगर समाज येथे चपला आणि बुटांची निर्मिती केली जाते. तेथे काहीजण मोठ्या प्रमाणात नायके आणि आदिदास या कंपन्यांच्या नावे बनावट पादत्राणे तयार करत असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत खात्री करून घेतल्यानंतर नेहरूनगर पोलीस ठाण्यात याबाबत पत्र दिले होते.
त्याची दखल घेऊन पोलिसांनी अधिकाऱ्यांसह रविवारी ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरातील एम.एस. ट्रेडर्स या दुकानावर छापा घातला. त्यावेळी या दुकानातून पोलिसांना तब्बल आठ लाख ४१ हजार रुपये किंमतीच्या बनावट चपला आणि बूट जप्त केले आहेत. पोलिसांनी कारखाना मालक हसीम अली (३८) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.