मुंबई : मुंबई पोलिसांकडून नुकताच एका अजगराच्या पिलाला जीवदान देण्यात आले. समुद्रात गस्त घालत असताना आढळलेल्या अजगराच्या पिलाचा सुरक्षितपणे बचाव करण्यात आल्यानंतर त्याला वन्यजीवासाठी कार्य करणाऱ्या संस्थेकडे सोपविण्यात आले. अजगराच्या पिलाची वैद्यकीय तपासणी, तसेच आवश्यक उपचार केल्यानंतर वन विभागाच्या सहकार्याने पिलाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मुंबई पोलीस समुद्रात गस्त घालत असताना त्यांना एक अजगराचे पिल्लू (बेबी इंडियन रॉक पायथन) आढळून आले. अनेक तास पाण्यात राहिल्याने हे पिल्लू अस्वस्थ झाले होते. पोलिसांनी तात्काळ या पिलाची सुरक्षितपणे सुटका केली. त्यानंतर अजगराच्या पिलाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर’ (रॉ) या संस्थेकडे सोपविण्यात आले. संस्थेच्या पशुवैद्यक डॉ. प्रीती साठे यांच्या देखरेखीखाली पिलावर उपचार करण्यात आले.

दरम्यान, १२ तास देखरेखीखाली ठेवल्यानंतर, तसेच वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर अजगराच्या पिलाला वनविभागाच्या सहकार्याने पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचावकार्यात मुंबई -०९ नौका पथकातील पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ऑगस्ट महिन्यात याच पथकाने १०० किलो वजनाच्या दुर्मीळ लॉगरहेड कासवाचा सुरक्षितपणे बचाव केला होता.