करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत असून कडक पहारा देत आहेत. त्यातच निसर्ग वादळामुळे निर्माण झालेलं संकट असो किंवा मग मुंबईत निर्माण झालेली पूरपरिस्थिती असो, पोलीस प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांच्या या सर्तकतेचं उदाहरण वाळकेश्वर येथेही पहायला मिळालं. मुंबई पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनी समुद्रात बुडत असलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला.

मुंबई पोलिसांनी व्हिडीओ ट्विट केला असून प्रत्येक दोरीच्या शेवटी आशा असते असं म्हटलं आहे. अडचणीच्या वेळी आम्ही नेहमी हजर असून असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाळकेश्वर येथे एक व्यक्ती तोल गेल्याने समुद्रात पडली होती. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल माने आणि शिगवन यांनी मदतीसाठी धाव घेतली. दोर टाकत त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी दोर छोटा पडत होता. पण तरीही त्यांनी प्रयत्न करत दोर त्याच्यापर्यत पोहोचवला आणि जवळ येताच हात देऊन वर काढले आणि जीव वाचवला.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या मदतीला धावलेल्या या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे.