निशांत सरवणकर nishant.sarvankar@expressindia.com @ndsarwankar

माहीम येथील समुद्रकिनारी मृतावशेष असलेली सुटकेस सापडली तेव्हा मृत व्यक्तीची ओळख पटवणे हेच पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते. अशा वेळी शर्टवर लावलेले टेलरच्या नावाचे लेबल पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. अर्थात त्यानंतरही आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते..

माहीम येथील प्रसिद्ध दग्र्यामागे असलेल्या समुद्रकिनारी २ डिसेंबर रोजी एक सुटकेस वाहत आली. सुटकेस उघडण्यात आली तेव्हा त्यात उजव्या पायाचा खालचा भाग, डावा हात आणि गुप्तांग तसेच काही कपडे होते. अज्ञात व्यक्तीची हत्या करून शरीराच्या विविध अवयवांची विल्हेवाट लावण्यात आली असावी, हे स्पष्ट होते. ही मृत व्यक्ती कोण असावी आणि त्याची हत्या का करण्यात आली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.

माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनीही समांतर तपास सुरू केला. मृत व्यक्तीच्या शरीराचे इतर अवयव सापडणेही आवश्यक होते. सर्व पोलीस ठाण्यांना ही माहिती व छायाचित्रे पाठविण्यात आली. परंतु तोपर्यंत कुठूनही अधिक माहिती मिळाली नाही. या सुटकेसमध्ये पोलिसांना शर्ट सापडले. मृताचे कापलेले अवयव या शर्टात गुंडाळण्यात आले होते. रक्ताने माखलेल्या या शर्टावर ‘अल्मो टेलर’ असा टॅग होता. हाच तो एकमेव दुवा होता. हरवलेल्या व्यक्तींचा तपशीलही मागविण्यात आला. परंतु त्यातून काहीही माहिती हाती लागत नव्हती. त्यामुळे हातात असलेला एकमेव दुवा घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक आयुक्त नेताजी भोपाळे, वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि निरीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह साहाय्यक निरीक्षक महेंद्र पाटील, गणेश जाधव, सुरेखा जंजाळ, उपनिरीक्षक महेश बंडगर तसेच सर्फराज मुलानी, नीतेश विचारे, नितीन जाधव, रोहिदास वंजारे यांनी तपास सुरू केला.

‘अल्मो टेलर’ हे दुकान गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाजवळच होते. शिंप्याला शर्ट दाखविण्यात आले. शर्ट आपल्याकडे शिवण्यात आल्याचे त्याने मान्य केले. मात्र केवळ शर्टावरून तो कोणाचा असावा, हे ओळखणे कठीण असल्याचे त्याने सांगितले. तोपर्यंत पोलिसांनी पावती पुस्तकातून काही दुवा मिळतो का, याची तपासणी सुरू केली. अशा पद्धतीचा शर्ट शिवण्यासाठी दिलेल्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले गेले. त्याची चौकशी केली तेव्हा त्याने तो शर्ट घरात वाळत घातल्याचे सांगितले. त्यामुळे हा शर्ट त्याचा नव्हता, हे स्पष्ट झाले. संबंधित मृतदेह वेगळ्याच व्यक्तीचा होता, हे उघड झाले आणि पोलिसांपुढील आव्हानात भर पडली. शर्टचे मोजमाप घेतल्यानंतर ते परिधान करणारी व्यक्ती जाडजूड असावी, असा अंदाज शिंप्याने व्यक्त केला. तोपर्यंत अल्मो टेलरच्या पावती पुस्तकाचा या शर्टाशी तंतोतंत मिळताजुळता कपडा सापडला. या पावतीवर ‘बेनेट’ इतकेच लिहिलेले होते. मग बेनेटचा शोध सुरू झाला. त्यासाठी पोलिसांना समाजमाध्यमाचा आसरा जवळचा वाटला. बेनेट नावाची व्यक्ती फेसबुकवर आढळते का, या कामाला पोलीस पथक लागले. बेनेट नावाची असंख्य प्रोफाईल्स आढळून आली. प्रत्येक प्रोफाईल जातीने तपासण्यात आले. सतत दोन-तीन दिवस प्रयत्न सुरू होता. पहिल्या टप्प्यात हाती फारसे लागले नाही. प्रत्येक प्रोफाईलमधील फोटो जातीने तपासण्यात आले. अखेर एका प्रोफाईलमधील स्वेटर घातलेल्या व्यक्तीकडे या पथकाची नजर खिळली. हे स्वेटर तेच होते, जे माहीम दग्र्यामागील समुद्रकिनारी मिळालेल्या बॅगेत सापडले होते. त्यामुळे ही तीच व्यक्ती असावी, असा पोलिसांचा कयास होता. प्रोफाईलवरून या व्यक्तीची आणखी माहिती मिळाली. त्याचे व्हिजिटिंग कार्डही मिळाले. त्यावरून त्याचे नाव बेनेट रिबेलो असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा पत्ताही त्यावर होता. संगीतकार वा वादक वापरतात तशी स्वरलिपीही आढळली. सुटकेसमध्ये सापडलेले शरीराचे अवयव याच व्यक्तीचे असावेत, याबाबत पोलीस ठाम होते. कायदेशीरदृष्टय़ा खात्री पटविण्यासाठी हे अवयव डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले. बेनेटच्या भावाचा शोध घेऊन त्याच्या रक्ताचे नमुने तंतोतंत जुळले. त्यामुळे हा बेनेटचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. बेनेटच्या पत्त्यावरून त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. वाकोला येथे एका छोटेखानी खोलीत तो राहात होता. पोलिसांनी या खोलीवर पाळत ठेवली. या खोलीत दिवा जळत होता. एक मुलगा व मुलगी यांची सारखी ये-जा सुरू होती. साध्या वेशातील पोलिसांनी तोपर्यंत बेनेटबाबत माहिती मिळविली होती. एका अल्पवयीन मुलीला त्याने दत्तक घेतले होते. अर्थात कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हतीच. पण ती त्यांच्यासोबत राहात होती. तो स्त्रीलंपट असल्याचीही माहिती मिळाली. त्याची हत्या का करण्यात आली हे पोलिसांना कोडेच होते. पोलिसांनी मुलीसह मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला सदर मुलगी रितिका (नाव बदलले आहे) आपण १९ वर्षांचे असल्याचे सांगत होती तर तिच्यासोबत तिचा मित्र १६ वर्षांचा होता. सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे नंतर स्पष्ट झाले. हे दोघेही दिशाभूल करणारी उत्तरे देत होते. बेनेट कॅनडाला गेल्याचे ते सांगत होते. पण घरातल्या भिंतीवरील रक्ताबाबत विचारताच त्यांची बोबडी वळली. मग पोलिसांना या हत्येची उकल करण्यात वेळ लागला नाही.

रितिका ही गरीब कुटुंबातील होती. आई-वडील असतानाही ती आई नसल्याचे सांगत असे. ती बेनेटकडेच राहात होती. बेनेटने आपला लैंगिक छळ केला. त्यामुळे मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला, असेही ती सांगत होती तर आणखी एका जबानीत मित्राने हत्या केली, असेही ती सांगत होती. तिची शारीरिक तपासणी करण्यात आली तेव्हा लैंगिक छळाबाबत अधिक स्पष्टीकरण देऊ शकली नाही. मात्र बेनेटची हत्या दोघांनी केल्याचे या चौकशीतून उघड झाले.

२६ नोव्हेंबरच्या रात्री दोघांनी बेनेटला बांबूने ठार केले. २७ व २८ नोव्हेंबर रोजी मृतदेह त्यांनी घरातच ठेवला होता. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, याची योजना ते आखत होते. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटली होती. परंतु त्या परिसरात दोन मांजरींच्या कुजलेल्या मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे बेनेटच्या कुजलेल्या मृतदेहाची शेजाऱ्यांना कल्पना आली नाही. २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री या दोघांनी डावा पाय दोन भागात कापला. घरात असलेल्या सुटकेसमध्ये भरला. ही सुटकेस तसेच हत्येसाठी वापरलेला बांबू, रक्ताने माखलेली चादर वेगळ्या पिशवीत घेऊन ते २९ नोव्हेंबरच्या पहाटे वाकोला पुलावर आले. आधी पिशवी नाल्यात फेकली तर कापलेले पाय बाहेर काढून ते टाकून दिले. रिकामी सुटकेस घेऊन ते पुन्हा घरी गेले. त्याच दिवशी सकाळी त्यांनी विद्याविहार येथे राहणाऱ्या अलीमियाँ चाऊस (२०) याला घरी बोलाविले. त्यानंतर या दोघांनी मृतदेहाचे दोन्ही हात, उजवा पाय, गुप्तांग कापले. ते सुटकेसमध्ये भरण्यात आले. दुर्गंधी पसरून संशय येऊ नये म्हणून मोठय़ा प्रामणात धूप जाळण्याचा सल्ला अलीमियाँ याने दिला तसेच शरीराचे अवयव सुटकेसमध्ये तसेच पिशवीत भरण्यासाठी मदत केली. त्यानंतर तो निघून गेला. मृताचे मुंडके आणि धड या दोघांनी बाथरूममध्ये ठेवले होते. वेगवेगळ्या पिशव्या, बॅगेत भरून त्या वांद्रे-कुर्ला संकुलातून वाहणाऱ्या मिठी नदीत टाकण्यात आल्या. त्यापैकी दुसरी बॅग कुर्ला येथील टॅक्सीमेन कॉलनीत १० डिसेंबरला तर तिसरी बॅग कुर्ला कोर्टाच्या मागे ११ डिसेंबरला मिळाली. बेनेट याचे डोके तसेच धड हे १३ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क समुद्रावर मिळाले. आता फक्त डाव्या पायाचा खालचा भाग सापडणे बाकी आहे.

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून दोघेजण अल्पवयीन असल्यामुळे बालसुधारगृहात आहेत तर अलीमियाँ तुरुंगात आहे. बेनेटने आपल्याला दत्तक घेतल्यामुळे त्याची संपत्ती आपल्याला मिळेल, या हेतूने हत्या केल्याची कबुली रितिकाने दिली आहे.

रितिकाच्या मोबाइल फोनवर मृतदेहाचे तुकडे केल्याची ध्वनिचित्रफीतही पोलिसांना आढळली. हत्या केल्यानंतर तीन दिवस मृतदेहासह राहून त्याचे तुकडे करण्यासाठी गॅसवर गरम केलेला सुरा थंड डोक्याने वापरणे, ही क्रूरता कोठून आली असे पोलिसांनी विचारले तेव्हा या दोघांनी शांतपणे उत्तर दिले की, आम्हालाच ते सुचले. त्यांच्या या उत्तराने पोलिसांची अस्वस्थता मात्र अधिकच वाढली.