मद्यपान करून गाडी चालवणे, वेगात गाडी चालवणे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. याशिवाय दुचाकी चालवणारे अनेक जण हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. या नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक विभागाकडून मोहिमा राबवल्या जातात. सौरव गांगुली, गौतम गंभीर यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू या मोहिमेअंतर्गत जाहिरातींचा भाग आहेत. वाहतुकीच्या नियमांचे आणि करोना निर्बंधांचे पालन व्हावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलीसदेखील सोशल मीडियाची मदत घेत असते. नुकतचं त्यांनी हेल्मेटबद्दल जनजागृती करण्यासाठी कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’सोबत मिळून एक व्हिडिओ तयार केला आहे.

या व्हिडीओचा उद्देश लोकांना दुचाकी चालवताना योग्य प्रकारे हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या पोस्टला अगदी मजेशीर कॅप्शन देण्यात आलंय. “द ग्रेट खलीला माहित आहे की व्यवस्थितरित्या हेल्मेट न घालता तुम्ही फक्त घरीच राईड करू शकता. त्यामुळे गाडी चालवताना हेल्मेट लावा आणि आपली मान लाजेने ‘खाली’ होऊ देऊ नका”. या व्हिडिओत खलीच्या डोक्यापेक्षा हेल्मेट लहान असल्याने ते घालण्यासाठी तो धडपडताना दिसत आहे.

या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर ६४ हजार लोकांनी पाहिलंय. तर ट्विटरवर देखील अनेकांनी व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाहतुकींच्या नियमांसंदर्भात जनजागृतीसाठी मुंबई पोलीस क्रिएटीव्ह पोस्ट शेअर करत असतात. दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनदरम्यान हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्सचा वापर त्यांनी केला होता. राजेश खन्ना यांच्या “पुष्पा आय हेट टिअर्स रे” या डायलॉगला “पुष्पा, वी हेट रुल ब्रेकर्स रे” म्हणत लोकांना घरीच राहण्याचा संदेश दिला होता.