मुंबई पोलीस तणावग्रस्त आणि विविध आजारांनी ग्रासलेले आहेत. गेल्या वर्षी मुंबईतल्या तब्बल १४७ पोलिसांचा कामावर असताना मृत्यू झाला. त्यापैकी ४१ जणांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला. मुंबईत पोलिसांसाठी गुरुवारी एकदिवसीय योग शिबीर पार पडले. त्या वेळी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ही माहिती दिली.
धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनशैलीत पोलिसांनी तंदुरुस्त राहावे यासाठी या एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून तंदुरुस्त राहण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राकेश मारिया यांनी मुंबईतल्या पोलिसांवरील ताणाची माहिती दिली. मुंबईत ४६ हजार ४१८ पोलीस आहेत. परंतु कामाच्या तणावामुळे उद्भवलेल्या आजारांमुळे २०१४ मध्ये तब्बल १४७ पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४१ पोलीस हे हृदयविकाराच्या  झटक्याने दगावले. तर तीन पोलिसांनी आत्महत्या केल्याची माहिती मारिया यांनी दिली. मुंबईतल्या बहुतांश पोलिसांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याचे एका पाहणीत आढळून आले होते. एकीकडे तणावग्रस्त वातावरण असताना दुसरीकडे मुंबईत गुन्ह्य़ांची उकल करण्याचे प्रमाण वाढले असून ते ६३ टक्के एवढे विक्रमी झाल्याचे मारिया यांनी सांगितले. देशातील सर्व पोलिसांमधील मुंबई पोलिसांची ही कामगिरी सर्वोत्तम असल्याचे ते म्हणाले.