मुंबई : श्रावणातील सणासुदीचे दिवस हेरून मराठी मतदारांशी जवळीक साधण्याची चढाओढ भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) सुरू झाली आहे. मंगळागौर, श्रावणोत्सव, हळदी-कुंकू, दहीहंडी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा अशा विविध उपक्रमांतून मतदारसंघनिहाय जनसंपर्क वाढवला जात आहे.

मुंबईतील विधानसभेच्या एकूण ३६ मतदारसंघांपैकी तब्बल १६ ते १८ जागांवर मराठी मतदारांचा थेट आणि निर्णायक प्रभाव आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येत मराठी भाषिकांचे प्रमाण सुमारे ३५ ते ४० टक्के असल्याने, येथील राजकीय सत्तेची गणिते ठरवण्यात मराठी माणूस नेहमीच महत्वाच्या भूमिकेत राहिला. महापालिका निवडणुकीतही मराठी मतांची ताकद दिसून आली. त्यामुळे कोणतीही निवडणुक तोंडावर नसताना मंगळागौरमधून महिलांशी आणि दहीहंडीमधून तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात मोफत बसगाड्या सोडण्याकरिता तर नगरसेवकांपासून मंत्र्यापर्यंत सर्वच राजकीय पक्षांचे नेते पुढे सरसावले आहे.दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदा पथकांना आर्थिक आणि अन्य मदत देणे, मोठी बक्षिसे जाहीर करणे आणि उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना जोडणे यावर भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा भर आहे. तर महिला आघाडींकडून मंगळागौरच्या स्पर्धा आयोजिल्या जात आहेत. यात भाजपचे अमराठी नेतेही मागे नाहीत.

भाजपच्या या कार्यक्रमांना शिंदे सेनेकडूनही समांतर सांस्कृतिक संपर्काची जोड दिली जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदरसह विविध भागांत मंगळागौर सोहळे घेण्यात येत आहेत. पारंपरिक खेळ, फुगडी, झिम्मा आणि महिलांचा सन्मान अशा माध्यमातून महिला मतदारांशी संपर्क साधला जात आहे. तर ठाण्यात नगरसेविका आणि पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने खेळ मंगळोगौरीचा ही भव्य स्पर्धा नुकतीच पार पडली. तर मीरा भाईंदरमध्ये मंगळागौरीचा जल्लोष करत २४ प्रभागांमधील महिलांना यात सहभागी करून घेण्यात आले.मुंबईतही शिवसेना शिंदे गटाच्या महिलाआघाडीचा ठिकठिकाणी मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यावर भर आहे. मध्य मुंबईत वरळी शिवडी, भायखळा या तीन विधानसभा मतदारसंघात मिळून मंगळागौर स्पर्धेचे आयोजन शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे करण्यात येणार आहे.

दुसरीकडे ‘अ-मराठी मतदारांचा पक्ष’ अशी होणारी टीका पुसण्यासाठी भाजपकडून मराठी सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील भाजपच्या महिला नेत्यांकडून अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. भाजपच्या नगरसेविका योगिता पाटील यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमातून महिलांना एकत्र आणले गेले. त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्या प्रतिभा गिरकर यांच्या पुढाकाराने कांदिवलीत मंगळागौरचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा सहभाग या माध्यमातून स्थानिक महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांतून झाला. भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने दहिसरमध्ये आयोजिण्यात आलेल्या श्रावणोत्सवातूनही महिलांना एकत्र आणण्यात आले.

बोरीवली हा भाजपचा मजबूत गड असला तरी मराठी मतदारांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिले जात आहे. बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या वतीने बुधवारी रघुलीला मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला मंगळागौर कार्यक्रम उदाहरण म्हणून देता येईल. उपाध्याय यांनी यापूर्वीही मंगळागौर, गुढीपाडवा आणि हळदी-कुंकू यांसारखे कार्यक्रम घेतले असून, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मोफत बससेवेचेही नियोजन केले आहे.

कोकणवारीतून चाकरमान्यांशी नाते

मुंबईतील मराठी आणि कोकणी समाजासाठी गणेशोत्सव हा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतानाच या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे राजकीय गणितही जोडले गेले आहे.

ठाकरे गटाच्या पारंपरिक मतपेढीला शह?

मुंबईच्या राजकारणात मराठी मतदार हा शिवसेनेच्या राजकारणाचा पारंपरिक आधार राहिला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात या मतांवर वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरू आहे. त्यात भाजपचाही सक्रिय प्रवेश झाला आहे. भाजप आणि शिंदे सेना यांची सत्तेत भागीदारी असली तरी मराठी मतदारांशी थेट संपर्क साधण्याच्या बाबतीत दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसत आहे. मंगळागौर, श्रावणोत्सव आणि हळदी-कुंकूच्या माध्यमातून महिलांपर्यंत, दहीहंडीच्या माध्यमातून तरुणांपर्यंत आणि कोकणवारीच्या माध्यमातून मराठी-कोकणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.