मुंबई : मुंबईत हवा प्रदूषणासह इतरही गोष्टींमुळे होणाऱ्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नागरिकांमध्येही याबाबत जागरूकता वाढताना दिसत असून यासंबंधी येणाऱ्या तक्रारींमध्ये मागील दशकभरापासून लक्षणीय वाढ झाल्याचे ‘प्रजा फाउंडेशन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘नागरी अहवाल २०२६’मध्ये नमुद करण्यात आले आहे. त्यात २०१६ ते २०२५ या कालावधीत प्रदूषणसंबंधी तक्रारींमध्ये सर्वाधिक म्हणजे ५३१ टक्क्यांनी वाढ झाली असून घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारींमध्ये २८१ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे.

मुंबईतील नागरी सोयी-सुविधांचा आढावा घेणारा अहवाल ‘प्रजा फाऊंडेशन’ने नुकताच प्रसिद्ध केला. त्यात मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त होणाऱ्या एकूण तक्रारी, त्या निवारण करण्याचा कालावधी आणि कोणत्या प्रकारच्या तक्रारी अधिक असतात याचा सविस्तर अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यासाठी मागील दशकभराच्या विदेचाही (डेटा) आधार घेण्यात आला असून २०१६ मध्ये एकूण तक्रारींची संख्या ८१ हजार ५५५ इतकी होती, तर २०२५ मध्ये ती १ लाख ३० हजार ६६ वर पोहोचली आहे.

यात सर्वाधिक तक्रारी या प्रदूषणासंबधी आणि घन कचरा व्यवस्थापनाच्या संबधी आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात पालिकेकडे २०१६ साली प्रदूषणासंबंधी २२० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर २०२५ साली हीच संख्या ५३१ टक्क्यांनी वाढली असून १ हजार ३८९ पर्यंत पोहोचली आहे. तसेच घनकचरासंबधी तक्रारींची संख्या २०१६ मध्ये ७ हजार ३३० इतकी होती, यात २०२५ मध्ये वाढ होऊन हीच संख्या २७ हजार ९३८ इतकी म्हणजेच २८१ टक्क्यांनी वाढली.

सांडपाणीविषयक तक्रारींमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन नागरी सेवांच्या बाबतीत तत्पर असले तरीही पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात नोंदविले आहे. तसेच २०१७ ते २०२५ कालावधीत नागरिकांच्या तक्रारींमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही तक्रार निवारण करण्याचा सरासरी कालावधी ४८ दिवसांवरून ३० दिवसांवर आला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.