मुंबई: खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेला रस्ते कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा, यामध्ये कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी रस्ते कामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत त्यांनी दिले. रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्ष राहा, सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यादरम्यान कोणतेही काम सुरू केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही निर्देश भिडे यांनी दिले आहेत.
रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे १२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी. टप्पा २ मधील कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. रस्त्यांची कामे करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले. इथे पाहा आपल्या विभागातील रस्त्यांची माहिती …. मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील रस्ते कामांची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांची इत्यंभूत माहिती दर्शविणारी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://roads.mcgm.gov.in/publicdashboard या लिंकवर हा माहितीपूर्ण ‘डॅश बोर्ड’ सर्वांसाठी खुला आहे. विशेष म्हणजे हा ‘डॅश बोर्ड’ प्रत्येक दिवशी अपडेट करण्यात येतो.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या दालनात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त गिरीश निकम, उप आयुक्त प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी उपस्थित होते.
रस्त्यांची ७१ टक्के कामे पूर्ण … रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) संपूर्ण लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर ५५९ रस्त्यांचे संगमस्थान ते संगमस्थान (१७१.४० किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ किलोमीटर पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजेच ७१ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदाराशी मुंबईकर साधू शकतात आपल्या परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे, महानगरपालिकेच्या कोणत्या अभियंत्याकडे संबंधित रस्त्याची जबाबदारी आहे, त्या दोघांचे नाव आणि संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती ‘डॅश बोर्ड’वर उपलब्ध आहे. त्यामुळे कंत्राटदाराशी आणि जबाबदार महानगरपालिका अधिकाऱ्याशी थेट संवाद साधू शकणार आहेत.
नागरिकांना तक्रारही करता येणार आपल्या परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामांबाबत मुंबईकरांना पारदर्शक माहिती देण्यासह त्यांना रस्त्यांच्या कामांबाबत मत व्यक्त करण्याची संधी देखील या ‘डॅश बोर्ड’वर देण्यात आली आहे. नागरिकांनी तक्रारीची नोंद केल्यानंतर रस्ते कामांच्या अधिकाऱ्याला त्याबाबत लगेच त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश मिळतो.
