मुंबई : मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था आणि रस्ते बांधकामातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ वॉचडॉग फाऊंडेशनने गुरुवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सहार रोडवरील मेट्रो – ३ स्थानकाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये जिवंत झुरळ सोडून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात येणार आहे.
कुर्ला आणि भलेश्वर येथे गणेश आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेने सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असला तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी मुंबईकर करत असतात. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून वॉचडॉग फाऊंडेशनने या मुद्द्यावर आवाज उचलण्याचे ठरविले आहे. सहार मार्गावरील सहार मेट्रो-३ स्थानकाजवळ गुरुवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. काँक्रिटीकारणानंतरही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कायम असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झुरळांचा प्रतिकात्मक वापर करण्यात येणार असल्याचे वॉचडॉग फाउंडेशनने सांगितले.
अस्वच्छता, दुर्लक्ष आणि वारंवार तक्रार करूनही कायम राहणाऱ्या समस्यांचे प्रतीक म्हणून झुरळांचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) तसेच संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संस्थेने सांगितले.
