मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, अद्यापही अनेक भागात खड्ड्यांची समस्या कायम असून केवळ शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल ३.८४ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे पालिकेच्या नियोजनावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रस्तावावर आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी जोरदार टीका केली.
महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पामुळे यंदा खड्डे दुरूस्तीच्या खर्चात मोठी बचत झाल्याचा, तसेच खड्ड्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. रस्ते काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पांतर्गत शहर विभागातील १२९ किमी रस्त्यांपैकी आतापर्यंत ५६ किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. जूनपासून आतापर्यंत शहर विभागातून खड्ड्यांबाबत एकूण १२२८ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यापैकी ११६३ तक्रारींचे पालिकेने निवारण केले. ४१ तक्रारी अन्य प्राधिकरणांच्या असल्याने त्या संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत. अशातच शहर भागातील विभाग ए, बी, सी, डी आणि ई मधील दुरावस्था झालेले रस्ते, दोषदायीत्व कालावधीमध्ये नसलेले व पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने तब्बल ३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
मार्च २०२७ अखेरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. काँक्रिटीकरणावर कोटींचा खर्च करूनही केवळ शहर विभागातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी पुन्हा कोटींचा खर्च करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कंत्राटासाठी पालिकेने मेसर्स. मानष कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड केली आहे. संबंधित विभागातील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे मास्टिक वापरून बुजविण्यासाठी तब्बल दोन कोटी एक लाख ९९ हजार ९४४ रुपये, तर ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या खड्ड्यांसाठी एक कोटी ८३ लाख १८ हजार ५७७ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. म्हणजेच शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी एकूण तीन कोटी ८५ लाख १८ हजार ५२१ रुपये खर्च पालिकेला करावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
मानष कन्स्ट्रक्शन यांची निवड या कामासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेला मेसर्स. मानष कन्स्ट्रक्शन कं., मेसर्स व्ही जे कॉर्पोरेशन आणि मेसर्स शिवलाल भिखाजी या तीन कंत्राटदार कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला होता. मात्र, मेसर्स मानष कन्स्ट्रक्शन यांनी सहा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी उणे २३.८८ टक्के आणि ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांसाठी उणे २३.८८ टक्क्यांनी काम करण्याची तयारी दर्शविली. दर विश्लेषणाची पडताळणी केल्यानंतर महापालिकेने मानष कन्स्ट्रक्शन यांची निवड केली.
‘खिसे भरले मात्र खड्डे भरले नाही’
आदित्य ठाकरे संतप्त मुंबईतील सर्व रस्ते दोन वर्षांत खड्डेमुक्त होतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी विधी मंडळात केला होता. आता चार वर्ष झाली तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरले, मात्र रस्त्यावरचे खड्डे भरले नाहीत, अशी कडवी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
१८०० किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण – महानगरपालिका प्रशासनाने ‘खड्डेमुक्त मुंबई’चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईत एकूण २०५० किमीचे रस्ते असून त्यापैकी सुमारे १३०० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे महापालिकेने पूर्ण केली.
- उर्वरित ७०० किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात हाती घेण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत ५४० हून अधिक रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच आतापर्यंत सुमारे १८०० किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.
- काँक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मे २०२७, तर टप्पा – २ मधील कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
खड्ड्यांबाबतच्या तक्रारी विभाग….प्राप्त तक्रारी…तक्रारींचे निवारण…अन्य प्राधिकरण शहर…… १२२८…..११६३…..४१ पूर्व उपनगरे…..२०२९……१९२३……४८ पश्चिम उपनगरे……२३८५……२१५९……६७
