मुंबई: भूक लागल्याने पित्याकडे दुधासाठी हट्ट करणाऱ्या चार वर्षीय चिमुरड्याची त्याच्याच पित्याने भिंतीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पवई परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी पित्यावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पवईच्या मोरारजी नगर येथील गौतम नगर परिसरात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. तेथे राहणारा आरोपी राजेश सिंग (२६) याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीशी नेहमीच वाद होत होते. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी त्याची पत्नी दोन्ही मुलांना आरोपीकडे सोडून माहेरी निघून गेली होती. त्यातील मयत मुलगा यश सिंग (४) हा विशेष बालक असल्याने तो दुधावरच अवलंबून होता. शनिवारी पहाटे त्याला भूक लागल्याने तो पित्याकडे दुधासाठी हट्ट करत होता. मात्र दारूच्या नशेत असलेल्या पित्याला त्याचा राग आल्याने त्याने या मुलाला भिंतीवर आपटले. त्यानंतर तो झोपी गेला.

शनिवारी सकाळी मुलगा उठत नसल्याने त्याने तत्काळ परिसरातच राहणाऱ्या बहिणीच्या घरी धाव घेतली. तिला त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिने तत्काळ भावाचे घर गाठले. याठिकाणी गेल्यानंतर तिने या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्याने तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलिसांनी मुलाला तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत आरोपीच्या बहिणीने पवई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.