मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्याचा फटका येथील जनजीवनाही बसला होता. पवई परिसरातील नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडलेल्या एका ६ फूट मगरीला वाचवण्यात वन विभाग आणि वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना यश आले. मगरीला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पवई आणि विहार तलाव येथे निसर्ग संपन्न जागा असून अनेकदा पावसाळ्यात वन्यजीव नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडतात. पवई येथील चांदिवली दर्गा रोड परिसरात एका सहा फूट मगरीला वाचविण्यात नुकतेच यश आले आहे. येथील वाहनतळात उभ्या असणाऱ्या एका वाहनाखाली एक मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभाग, ‘स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम’ आणि ‘रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेल्फेअर’ (रॉ) या वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली. भरकटल्यामुळे ही मगर एका वाहनाखाली लपून बसली होती. मगरीला सुरक्षितपणे पकडल्यानंतर ‘रॉ’ संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकारी प्रीती साठे यांच्या देखरेखीखाली मगरीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मगरीला कोणतीही इजा झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही मोहीम ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ, सहाय्यक वनसंरक्ष सोनल वालवी आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुसळधार पावसामुळे मगर आपल्या नैसर्गिक अधिवासातून भरकटून या भागात आली असावी, असा अंदाज रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेल्फेअरचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी व्यक्त केला.

५६९ सापांना वाचविण्यात यश

पावसाळत मानवी वस्तीत साप आढळतात. पवई येथील एका उड्डाणपुलावर नुकताच कोब्रा प्रजातीचा साप मृतावस्थेत आढळला. भरधाव वेगात धावणारे वाहन अंगावरून गेल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरे, मीरा -भाईंदर आणि वसई- विरार परिसरात मागील महिन्याभरात ५६९ विविध प्रजातींच्या सापांना सुरक्षितपणे वाचविण्यात ‘स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम’ या संस्थेला यश आले. पावसाळ्यात साप अधिवासातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषतः रात्रीच्या वेळी वाहने हळू चालवावी, असे आवाहन ‘स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम’ संस्थेच्या संतोष शिंदे यांनी केले.