अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, हत्येप्रकरणी दोघांना अटक

कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मित्र इरफानसह हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.

मुंबईतील पवई येथील तुंगा व्हिलेज येथे राहणाऱ्या ४ वर्षीय श्रेया या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. रवी सोलंकी (२१) व समशेर ऊर्फ इरफान खान (२८) अशी या दोघांची नावे असून त्यांनी नशेमध्ये हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पवई येथील अल्पवयीन मुलगी श्रेया हिच्यावर अत्याचार करणारा रवी सोलंकी हा पवईतील तुंगा व्हिलेज येथेच राहणारा असून त्याला गांजा, चरस आणि दारूचे व्यसन आहे. तसेच चेंबूर येथे राहणारा इरफान हा त्याचा मित्र असून त्यालाही अमली पदार्थाचे व्यसन आहे. या दोघा नराधमांनी रविवारी रात्री नशेत असताना श्रेयाचे अपहरण करुन तिला ५०० मीटर अंतरावरील बंद पडलेल्या एका बिझनेस पार्कमध्ये आणून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला तेथील एका सांडपाण्याच्या टाकीत टाकून तेथून पळ काढला होता. यामध्ये श्रेयाचा मृत्यू झाला होता. रविवारपासून हरवलेल्या श्रेयाचा शोध घेत असताना बुधवारी दुपारी पवई पोलिसांना तिचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत सापडला होता. श्रेयाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असता तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पवई पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींच्या शोधासाठी तुंगा व्हिलेज परिसरातील सुमारे २५ नशाबाजांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली होती. या २५ जणांमध्ये रवी सोलंकीचा समावेश होता. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मित्र इरफानसह हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai powai molestation case