मुंबई : असह्य उकाडा आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गिरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून गिरगाव आणि माझगावातील काही भागांमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पश्चिम उपनगरातही अनेक भागांत वीज पुरवठा सुरळीत नव्हता. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
गेल्या दोन महिन्यांपासून गिरगाव भागात वीजेचा लंपडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त आहेत. बेस्टच्या पाठकवाडी विद्युत केंद्रातील कर्मचारी बिघाडाबाबत कोणतीही माहिती देत नसल्याने नागरिकांनी रात्री पाउणे दोन वाजण्याच्या सुमारास केंद्रावर गोंघळ घातला.
गिरगाव परिसरातील काही भागांमध्ये रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. ठाकूरद्वार रोड, जे.एस.एस. रोड, मुगभाट रोड, खेतवाडी, सी.पी. टँक आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना या समस्येचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, ही समस्या केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, गेल्या दोन महिन्यांपासून या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सकाळच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत, तसेच संध्याकाळी नागरिक घरी परतत असताना, वीज जाण्याच्या घटनांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
मध्यरात्रीपासून वीज गायब असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उंच इमारतींमधील लिफ्ट बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक,महिला आणि लहान मुलांना अनेक मजले चढ-उतार करताना मोठया अडचणींना सामोरे जावे लागले. वीज पुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठाही ठप्प झाला. अनेक इमारतीमध्ये पाण्याच्या मोटारी बंद पडल्याने नळांना पाणी आले नाही. पाणी नसल्याने दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांना सघर्ष करावा लागला.
वाढलेला वीजभार, जुनी केबल व्यवस्था आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, बेस्ट प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
नेमका बिघाड काय
मरिन लाईन्स रेल्वे स्थानकाखालील भूमिगत वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त होईपर्यत गिरगावातील विद्युत लोड दुसऱ्या वीज वाहिन्यांवर टाकला. सोमवारी पहाटे ३ वाजता लोड टाकलेल्या वीज वाहिन्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोड आल्यामुळे बिघाड झाला.तसेच परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) कामांमुळेही केबलवर अतिरिक्त ताण येत आहे.
जुन्या केबल्स बदलण्याची आवश्यकता
एअर कंडिशनर्सच्या वाढत्या वापरामुळे विजेची मागणी प्रचंड वाढस्याने वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे. बेस्टच्या वीजपुरवठा क्षेत्रांमधील अनेक केबल्स आणि विद्युत यंत्रणा जुन्या झाल्या असल्याने त्यांना तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे. बेस्टने विभागनिहाय मागणीचे सर्वेक्षण करून त्या-त्या क्षेत्रातील विजेच्या वापराच्या पद्धतींवर आधारित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत वीजतज्ञ व्यक्त करतात.
वीजेची मागणी वाढली
गेल्या काही आठवड्यात मुंबईतील विजेची मागणी ४,५०० मेगावॅटच्या (MW) विक्रमी उच्चांकावर पोहोचली. मे २०२४ मध्ये नोंदवलेला ४,३०० मेगावॅटचा मागील उच्चांक या मागणीने ओलांडला आहे.
वीज खंडीत तक्रारीत वाढ
गेल्या वर्षभरात, बेस्टला वीजपुरवठा खंडित झाल्याच्या सुमारे ७,५०० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी सुमारे २,५०० तक्रारींचे निराकरण झालेले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत तक्रारींमध्ये १५टक्यांनी वाढ झाली आहे.
