मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवासी कोंडी सोडविण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेने (बीएमसी) समन्वयाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण पादचारी पुलाच्या अरुंद प्रवेशद्वाराचे रुंदीकरण, अतिरिक्त जिन्याची उभारणी आणि त्यासोबतच १२ मीटर रुंद नवीन पादचारी पूल उभारण्याच्या प्रस्तावावर महापालिकेने तत्त्वतः विचार करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे प्रभादेवी स्थानकातील प्रवाशांची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई सेंट्रलचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ऑगस्ट रोजी प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवासी वाहतुकीबाबत समन्वय बैठक झाली. या बैठकीला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्यासह महापालिका, पश्चिम रेल्वे, महारेल, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांची सुरक्षित आणि सुरळीत ये-जा सुनिश्चित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील दक्षिण पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जुन्या स्वच्छतागृहाच्या जागेचा वापर करून प्रवेशमार्ग रुंद करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेने महापालिकेची आवश्यक परवानगी घेऊन हे स्वच्छतागृह पाडले असून त्यातील बांधकाम साहित्यही हटविण्यात आले आहे. त्यानंतर प्रस्तावित अतिरिक्त जिन्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.

सध्या या ठिकाणी पाणीवाहिन्या, विद्युत केबल आणि इतर सेवा सुविधांचा अडथळा आहे का, याची तपासणी करण्यासाठी ट्रायल पिटचे काम सुरू आहे. पायाभरणीचा आराखडा निश्चित करून प्रस्तावित पायाभरणीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त जिन्यासाठी आवश्यक स्टीलचे स्ट्रक्चरल सदस्य दादर कार्यशाळेत तयार करण्याचे कामही सुरू आहे.

दरम्यान, जुन्या स्वच्छतागृहाच्या बदल्यात जवळच्या रेल्वे वसाहतीतील स्वच्छतागृहातील दोन सुविधा स्थानिक रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यास पश्चिम रेल्वेने सहमती दर्शविली आहे. याशिवाय अतिरिक्त स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली आहे. सध्याच्या व्यवस्थेतून आणखी चार स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याची शक्यताही पश्चिम रेल्वेकडून तपासली जात आहे.

नव्या १२ मीटर पादचारी पुलाची आवश्यकता

कॅरोल उड्डाणपूल पाडल्यानंतर या परिसरातील पादचारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रभादेवी स्थानकातील विद्यमान पादचारी पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिमेकडील बाजूस १२ मीटर रुंद अतिरिक्त पादचारी पूल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी उपलब्ध महापालिका भूखंडाचा वापर करून अतिरिक्त पादचारी पूल, जिना आणि लिफ्ट उभारण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने पालिकेकडे सादर केला होता. मात्र, त्यावेळी महापालिकेने या प्रस्तावास सहमती दिली नव्हती. आता प्रवासी कोंडी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत महापालिकेने या प्रस्तावाची तत्त्वतः तपासणी करण्यास सहमती दर्शविली आहे. नव्या पादचारी पुलासाठी प्रवाशांची सोय, पादचारी वाहतूक, उपलब्ध जागा आणि अन्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन योग्य जागा निश्चित करण्याचे काम पश्चिम रेल्वे आणि महापालिका संयुक्तपणे करणार आहेत. या पुलाला जिना आणि लिफ्टची सुविधा देण्याचाही विचार आहे.

बेकायदा वाहनतळावर कारवाई

प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेशमार्गावर होणाऱ्या दुचाकींच्या अनधिकृत वाहनतळमुळेही प्रवाशांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत वाहनतळ करणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच उत्तर-पश्चिम प्रवेशद्वाराजवळील पादचारी पुलाच्या लँडिंगचा स्पर रुंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दक्षिण पादचारी पुलाला अतिरिक्त जिना, पश्चिमेकडे १२ मीटर रुंद नवीन पादचारी पुलावर, प्रवेशद्वाराचे रुंदीकरण आणि अनधिकृत वाहनतळावर कारवाई या उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवासी वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.