भावाच्या नावाने न्यूझिलंडचे पारपत्र मिळवून त्यावरून स्वतः बेकायदेशिररित्या प्रवास केल्याप्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. आरोपीकडे स्वतःच्या नावाचे एक भारतीय पारपत्र होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरोधात लुक आऊट सर्कुलर (एलओसी) जारी करण्यात आले होते. त्याच्या आधारे त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमलदीप झंडासिंह संधु (५१) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा मुंबईतील वर्सोवा येथील यारी रोड परिसरातील रहिवासी आहे. संधु यांच्याबाबत विशेष शाखेने तपासणी केली असता त्यांनी भारतासह न्यूझिलंडचे पारपत्रही मिळवले असल्याची माहिती मिळाली. कमलदीपने त्याचा भाऊ संदीपसिंह संधु याच्या नावाने न्यूझिलंडचे पारपत्र मिळवले असून त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. याशिवाय न्यूझिलंडच्या पारपत्राच्या सहाय्याने त्याने २००८-०९ मध्ये भारतात राहण्यासाठी व्हिजा प्राप्त केला होता. तसेच त्याने व्हिजा कालावधी वाढवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. याशिवाय विशेष शाखेच्या तपासणीत आरोपी २००९ ते २०१० या कालावधीतही अनेक वेळा भारतात आला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आले होते. त्याआधारावर मुंबई विमानतळावर अधिकाऱ्यांनी कमलदीपला थांबवून विशेष शाखेला याबाबतची माहिती दिली. अखेर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai prepared new zealand passport in brother name and traveled mumbai print news amy
First published on: 16-08-2022 at 16:55 IST