देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपदी पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना शौर्य पदक, तर चार जणांना अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या वायू गळतीच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सात जवानांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कस्तुरबा रुग्णालयात ७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारच्या वेळी दहा मेट्रिक टन क्षमतेच्या एलपीजी गॅसच्या टाकीतून वायूगळती झाली होती. एलपीजी गॅसच्या टाकीजवळच्या रुग्णालयाती कक्षात कावीळ व अन्य आजारांचे रुग्ण होते. तसेच जवळच्या इमारतीत करोनाचे रुग्णही दाखल होते. अचानक वायूगळती झाल्यामुळे रुग्णालयात घबराटीचे वातावरण पसरले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. यावेळी अग्निशमन दलाने वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच कमी वेळात ५८ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविले, तर कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सुखरूप बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना नुकतेच राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

अग्निशमन सेवा शौर्य पदक जाहीर झालेले अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुंबई महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यांना शौर्य पदक

किशोर ज्ञानदेव घाडीगावकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), विशाल चंद्रकांत विश्वासराव (वरिष्ठ केंद्र अधिकरी), दीपक मधुकर जाधव (केंद्र अधिकारी), सागर जगन्नाथ खोपडे (केंद्र अधिकरी), संजय सदाशिव गायकवाड (प्रमुख अग्निशामक), संजय लक्ष्मण निकम (अग्निशामक), गणेश देवराम चौधरी (अग्निशामक) या सात जवानांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर संपत बापूराव कराडे (विभागीय अग्निशमन अधिकारी), दत्तात्रय बंडू पाटील (प्रमुख अग्निशामक), संदीप रामचंद्र गवळी (यंत्रचालक), गुरुप्रसाद अनिल सावंत (सहाय्यक कार्यदेशक) यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे अग्निशमन सेवा पदक घोषित करण्यात आले आहे. याचाही आयुक्तांनी सत्कार केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai presidential bravery medal announced to seven firemen mumbai print news amy
First published on: 15-08-2022 at 17:28 IST