मुंबई : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने पाऊल पडले असून, मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राइम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे. ‘वेव्ह्स २०२५’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत. या कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे. प्राइम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा व्यापक पुनर्विकास आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘वेव्ह्स २०२५’ परिषदेदरम्यान महाराष्ट्र शासन आणि प्राइम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने अल्पावधीत आवश्यक मंजुरी दिल्यामुळे हा प्रकल्प साकार होऊ शकला असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार त्यांनी सांगितले. प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांनी मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि फिल्मसिटी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा संगम : ॲड. आशिष शेलार

संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम प्राईम फोकसच्या प्रकल्पात झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’च्या संकल्पनेला प्राइम फोकसने प्रत्यक्ष आकार देण्याचे काम केले आहे. सर्जनशीलता, सांस्कृतिक समृद्धी आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून देशासाठी नवे मानदंड या प्रकल्पाने निर्माण केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात सर्जनशील उद्योगांना नवी चालना मिळत आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नमूद केले.