मुंबई : खासगी सोसायट्यांच्या आवारातील झाडांच्या फांद्या छाटणीचा खर्च महापालिकेने उचलावा अशी मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात होणारे मृत्यू टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र खासगी सोसायट्यांमधील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी मुंबई महापालिका घेत नाही. खासगी सोसायट्यांना झाडांची छाटणी करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्यामुळे या झाडांची छाटणी करून घेण्याचा खर्च सोसायट्यांना परवडेनासा झाला आहे. परिणामी खाजगी सोसायट्यांमधील झाडांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत गेल्या आठवडाभरात झाड अंगावर पडून तीन जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडतात, तर कधी कमकुवत झालेली झाडे उन्मळून पडतात. यामुळे अनेकदा पादचाऱ्यांचा मृत्युही होतो. अशा घटना घडू नये म्हणून पालिकेतर्फे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी केली जाते. मात्र मोठ्या प्रमाणावर झाडे खासगी वसाहतींच्या हद्दीत आहेत. या झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी त्या सोसायट्यांची असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या आधी पालिका प्रशासन अशा सोसायट्या व शासकीय निमशासकीय संस्थाना झाडांची छाटणी करण्यासाठी नोटीस बजावते. मात्र खर्च परवडत नसल्यामुळे अनेक सोसायट्या झाडांची छाटणी करण्याचे टाळतात.
दरम्यान, दादरच्या दादासाहेब रेगे मार्गावरील शिवाजी पार्कच्या शंकर निवास सोसायटीत चार, पाच झाडे तोडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी २४००० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. मात्र आता दोन वर्षांत झाडे खूप वाढली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. छोट्या सासोयट्यांसाठी २५००० रुपये शुल्क खूपच जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने छाटणी करून द्यावी किंवा दर कमी करावे, अशी मागणी सोसायटीने केली आहे.
झाडे लावा सांगता, पण सेवा द्यायला काय हरकत…
एकिकडे मुंबई महापालिका नागरिकांना झाडे लावण्यासाठी आवाहन करत असते, मग त्या झाडांच्या छाटणीचा भार उचलायला मुंबई महापालिकेला काय हरकत आहे, असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका नागरिकांना एवढ्या सुविधा देत असते. त्यात ही एक सुविधाही महापालिकेने द्यायला काहीच हरकत नाही, असे मत किल्लेदार यांनी व्यक्त केले.
२०१८ च्या वृक्षगणनेनुसार…
मुंबईतील एकूण झाडे – २९ लाख ७५ हजार २८३
खासगी संस्थांच्या आवारांमध्ये – १५ लाख ५१ हजार १३२
शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये – १० लाख ६७ हजार ६४१ रस्त्याच्या कडेला – १ लाख ८५ हजार
विविध उद्यानांमध्ये – १ लाख १ हजार ६७
झाडांच्या छाटणीचे प्रतिझाड शुल्क
वृक्ष छाटणी – ९१२ ते ४४३४ रुपये (वृक्षाच्या घेरानुसार)
मृत झाड काढणे – ७४४ ते २२०९ रुपये
नारळाच्या झावळ्या काढणे
– ८७१ ते ९७५ रुपये
असे ठरते शुल्क
खासगी सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीचे शुल्क झाडांच्या बुंध्याचा घेर आणि आकारानुसार ठरते. हे शुल्क तीन ३ वर्गांत आकारले जाते. त्यात २ फुटांपेक्षा कमी घेर असलेल्या झाडांसाठी अंदाजे १,००० रुपये, तर २ ते ५ फूट घेर असलेल्या झाडांसाठी मध्यम स्वरूपाचे शुल्क आणि ५ फुटांपेक्षा जास्त घेर असलेल्या मोठ्या झाडांसाठी सर्वाधिक शुल्क आकारले जाते. सोसायटीच्या आवारात चार, पाच झाडे असली तरी खर्च वीस हजाराच्या घरात जातो. यामध्ये झाडाची छाटणी करणे आणि कचरा मुंबईबाहेर वाहून नेऊन त्याची विल्हेवाट लावणे या खर्चाचा समावेश असतो, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोसायट्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि स्वखर्चाने खाजगी कंत्राटदाराकडूनही झाडांची छाटणी करून घेऊ शकतात, मात्र त्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. सामान्यतः दर २ ते ३ वर्षांतून एकदा झाडांची योग्य छाटणी करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक मानले जाते.
