मुंबई : मुंबईतील मालमत्ताधारकांना मालमत्ताकरासंबंधित विविध सेवासुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता यावा, तसेच कर भरणा प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेने मालमत्ताकरासंदर्भात ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन सेवेसाठी मुंबईतील मालमत्ताधारकांना महापालिकेकडे केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून नागरिकांना https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/login या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर मालमत्ताधारकांना देयकांचा ऑनलाइन भरणा करणे, थकबाकी नसल्यास ना हरकत प्रमाणपत्र, देय रकमेचा भरणा केल्याचे प्रमाणपत्र पाहणे, मालमत्ताधारकाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, अधिदान केलेल्या देयकांचा अहवाल पाहणे आदी विविध सुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येईल.
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीत करनिर्धारण व संकलन खात्याच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मालमत्ताकरासंदर्भात ऑनलाइन सेवाही सुरु करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा प्रमुख स्त्रोत आहे. करनिर्धारण व संकलन खात्याकडून मुंबईतील मालमत्तांचे करनिर्धारण करून मालमत्तांना दरवर्षी कर देयके पाठवली जातात. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी १० लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना मालमत्ताकर देयके पाठवली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे ४ लाख मालमत्ताधारकांकडून मालमत्तांची ऑनलाईन पद्धतीने ‘केवायसी’ अद्ययावतीकरण प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना मालमत्ताकरासंदर्भात एसएमएस, ई मेलद्वारे वेळोवेळी सूचना प्राप्त होत आहेत.
केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताधारकांना देयकांचा ऑनलाइन भरणा करणे, थकबाकी नसल्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र, देय रकमेचा भरणा केल्याचे प्रमाणपत्र पाहणे, मालमत्ताधारकाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, अधिदान केलेल्या देयकांचा अहवाल पाहणे, मालमत्तेची खतावणी पाहणे, मालमत्तेचे परिशिष्ट पाहणे, मालमत्ता कर देयकनिहाय थकबाकी अहवाल पाहणे, अधिदानाची पोचपावती पाहणे आदी सुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येईल. त्याचबरोबर मालमत्ता कराशी संबंधित दिलेल्या सूचनाही ‘एसएमएस’ किंवा ‘ई मेल’च्या माध्यमातून प्राप्त होतील. मालमत्ता कर देयके तयार होताच त्याची ‘पीडीएफ’ स्वरूपातील सॉफ्ट कॉपीही करदात्यांना ‘ई मेल’द्वारे मिळवता येईल.
उर्वरित मालमत्ताधारकांनीही मालमत्ताकरासंदर्भातील ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता लेखा क्रमांक, नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, प्रवर्ग (उदा. मालक/सचिव/अध्यक्ष/लेखापाल/इतर) आदी माहिती भरावी लागेल. तसेच गृहनिर्माण संस्थेच्या शीर्षपत्रावरील (लेटरहेड) अधिकृत पत्र, गॅस देयक, वीज देयक, दूरध्वनी देयक आदी कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतील.