मुंबई : मुंबईत ऑगस्टमध्ये साडेबारा हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. तर या घरविक्रीतून ११०० कोटींहून अधिक रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या माध्यमातून राज्य सरकारला मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये घरविक्रीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ११ हजार २३० घरांची विक्री झाली असून, यातून १००० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्या तुलनेत ऑगस्ट २०२६ मध्ये १२ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली असून, यातून ११०० कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे.

चालू वर्षात आतापर्यंत घरविक्रीत मोठी वाढ दिसून आली नसली तरी विक्रीत घटही झालेली नसून, ती स्थिर आहे. जानेवारीत ११,२१९ घरांची विक्री झाली आहे, तर फेब्रुवारीत १३,०२९ घरांची विक्री झाली होती. मार्चमध्ये घरविक्रीत मोठी वाढ झाली व मार्चमध्ये १५,९८३ घरांची विक्री झाली.

एप्रिलमध्ये १४,२८५ घरांची विक्री झाली. मे, जून, जुलैमध्येही घरविक्री स्थिर राहिली. मेमध्ये १२,४०३ घरांची, जूनमध्ये १३,४१३ व जुलैमध्ये १३,८२४ घरांची विक्री झाली होती. तर आता ऑगस्टमध्ये १२,५०० हून अधिक घरांची विक्री झाली. जानेवारी व मेमध्ये घरविक्रीची संख्या १३ हजारांचा टप्पा पार करू शकलेली नाही. उर्वरित महिन्यांमध्ये मात्र घरविक्री १३ हजारांहून अधिक झाली आहे.

त्याचवेळी गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील घरविक्रीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये घरविक्रीत वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ११,२३० घरांची विक्री झाली होती, त्या तुलनेत ऑगस्ट २०२६ मध्ये १२,५०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत घरविक्रीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे जून व जुलैच्या तुलनेत घरविक्रीत मोठी घट झाली आहे.

जूनमध्ये १३,४१३ घरांची, तर जुलैमध्ये १३,८२४ घरांची विक्री झाली होती. जून, जुलैच्या तुलनेत एक हजारांहून अधिक कमी घरे विकली गेली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली असतानाच मागील १४ वर्षांच्या तुलनेतही यंदा ऑगस्टमध्ये घरविक्रीत वाढ झाली आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये ४,७७९ घरांची, ऑगस्ट २०१४ मध्ये ५,०३१ घरांची, ऑगस्ट २०१५ मध्ये ५,५७३ घरांची, ऑगस्ट २०१६ मध्ये ५,४४४ घरांची विक्री झाली.

१४ वर्षांतील सर्वाधिक विक्री ऑगस्ट २०१७ मध्ये ४,८८६ घरांची, ऑगस्ट २०१८ मध्ये ६,८६२ घरांची, ऑगस्ट २०१९ मध्ये ५,८७३ घरांची, ऑगस्ट २०२० मध्ये २,६४२ घरांची, ऑगस्ट २०२१ मध्ये ६,७८४ घरांची, ऑगस्ट २०२२ मध्ये ८,५८२ घरांची, ऑगस्ट २०२३ मध्ये १०,९०२ घरांची, ऑगस्ट २०२४ मध्ये ११,६३१ घरांची, तर ऑगस्ट २०२५ मध्ये ११,२३० घरांची विक्री झाली आहे. तर ऑगस्ट २०२६ मध्ये १२, ५०० हून अधिक घरांची विक्री झाली असून, मागील १४ वर्षांतील ही सर्वाधिक घरविक्री आहे.