मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरमधील (पत्राचाळ) चार भूखंडांवर गृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने २,३९८ घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पात उच्च गटासाठी १००० चौरस फुटांची १३३ घरे बांधण्यात येणार आहेत. मात्र त्याच वेळी अत्यल्प गट प्रकल्पातून बाद करण्यात आला आहे. अत्यल्प गटासाठी एकही घर या प्रकल्पात नाही. पत्राचाळ प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळाने येथील विक्रीयोग्य आणि म्हाडाच्या हिश्श्यातील भूखंडांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या भूखंडांवर घरे बांधण्यात येणार आहेत. या चारही भूखंडांवर २,३९८ घरे बांधण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठीच्या घरांचा या प्रकल्पात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळी सर्वाधिक मागणी असलेली अत्यल्प गटातील घरे या प्रकल्पातून बाद करण्यात आली आहेत. अत्यल्प गटासाठी एकही घर या प्रकल्पात नाही. हेही वाचा - मुंबई : रस्त्याची कामे चार टक्के अधिक दराने, प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा; ६४ कोटींचा अधिकचा भुर्दंड मध्यम गटासाठी मात्र या प्रकल्पात सर्वाधिक १,२४२ घरे बांधण्यात येणार आहेत. तर अल्प गटासाठी १,०२३ आणि उच्च गटासाठी १३३ घरांची निर्मिती केली जाणार आहे. ही घरे ४७३ ते १००० चौरस फुटांदरम्यान असणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रस्तावास नुकतीच म्हाडा प्राधिकरणाची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली असून आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करून बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरांची निर्मिती केली जाणार आहे. शक्य तितक्या लवकर प्रकल्प पूर्ण करून ही घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. हेही वाचा - मुंबई : ‘मेट्रो ३’ रखडली; सीएमआरएस, अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा; टप्पा ६ मधील कामेही अपूर्ण आर १ भूखंड ● बांधकाम क्षेत्रफळ- ४८३८.१७ चौरस मीटर ● मध्यम गटासाठी ५०४ घरे (७६९ चौरस फूट) ● उच्च गटासाठी ६८ घरे (१०१७ चौरस फूट) ● एकूण ५७२ घरे आर ७ भूखंड ● बांधकाम क्षेत्रफळ - ३१२७.७३ चौरस मीटर ● अल्प गटासाठी ३१६ घरे (४७९ चौरस फूट) ● मध्यम गटासाठी २६२ (८२८ चौरस फूट) ● एकूण - ५७८ घरे आर ४ भूखंड ● बांधकाम क्षेत्रफळ - ६०१९.५६ चौरस मीटर ● अल्प गटासाठी ७०७ घरे (४७३ चौरस फूट) ● मध्यम गटासाठी ३१८ घरे (७३१ चौरस फूट) ● एकूण १०२५ घरे आर १३ ● बांधकाम क्षेत्रफळ - २७६९.७८ चौरस मीटर ● मध्यम गटासाठी १५८ घरे (७४१ चौरस फूट) ● उच्च गटासाठी ६५ घरे (९९३ चौरस फूट)