मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईला मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्याच्या इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व उद्याने मंगळवार, ७ जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून पडणे किंवा इतर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पालिकेने केली आहे.

चेंबूरमध्ये ३० जून रोजी शाळेच्या बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यांनतर ५ जुलै रोजी झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दोघांचे नाहक बळी गेले. झाड पडल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. २ जुलै रोजी देखील सांताक्रुझ येथे झाड पडून आठ कामगार जखमी झाले होते. त्यानंतर सोमवारी सातजण जोगेश्वरी झाड पडून सातजण जखमी झाले. त्यामुळे महानगरपालिकेने याप्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. मुंबईत मंगळवारी सोसाट्याच्या वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी आपल्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित दिवशी उद्यानांना भेट देणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हवामान परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

रविवार आणि सोमवारी दोन दिवसांत मुंबईत झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे विविध ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. या कालावधीत एकूण ४०० झाडे आणि ६०० फांद्या पडल्याची नोंद झाली. या सर्व घटनांची माहिती प्राप्त होताच महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने कार्यवाही केली. संबंधित विभागीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मुंबई अग्निशमन दल तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने झाडे व फांद्या हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.