मुंबई विभागातील कल्याण – लोणावळा विभागात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. वांगणी – नेरळ स्थानकांदरम्यान सकाळी ८.४१ च्या सुमारास डिझेल इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक्स्प्रेस थांबवावी लागली. त्यामुळे एक्स्प्रेससह लोकल सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावल्या.

गाडी क्रमांक ११००७ सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस सीएसएमटीवरून सकाळी ७ च्या सुमारास निघाली. ही रेल्वेगाडी कल्याण येथे ८.०९ वाजता पोहचली. यावेळी ही रेल्वेगाडी १६ मिनिटे उशिराने पोहचली. त्यानंतर पुण्याच्या दिशेने रेल्वेगाडी मार्गस्थ होत असताना, वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाडी आली असता, अचानक थांबली. नेरुळऐवजी येथे रेल्वेगाडी का थांबली, असा प्रश्न प्रवाशांना पडला. अनेक प्रवासी रेल्वेगाडी बाहेर पडून काय झाले, याची पाहणी करत होते. परंतु, प्रवाशांना काहीच माहिती मिळाली नाही.

तब्बल दीड तास रेल्वेगाडी वांगणी येथे थांबल्याने, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. डेक्कन एक्स्प्रेसने सकाळी ११.०५ वाजता पुणे गाठणे अपेक्षित होते, मात्र ही रेल्वेगाडी लोणावळा पुढेही गेली नव्हती. त्यामुळे कार्यालयीन कामानिमित्त जाणारे कर्मचारी, पर्यटक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराचा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांना तब्बल दोन तास विलंबाचा सामना करावा लागला.

खोपोली, कर्जतवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तसेच वांगणी, भिवपुरी, कर्जत यादरम्यान लोकल एका मागे एक थांबल्या होत्या. लोकल बराच वेळ मार्गस्थ होत नसल्याने प्रवासी हैराण झाले होते. कसारा आणि कर्जतवरून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याचे वेळापत्रक कोलमडले. तसेच या मार्गावरील धीम्या लोकलला अर्धजलद किंवा जलद करून सीएसएमटीच्या दिशेने चालवण्यात आल्या. ऐनवेळी लोकल वेळापत्रकात बदल केल्याने, धीम्या मार्गावरील प्रवाशांना लोकलसाठी वाट पाहावी लागली.

इंजिन बिघाडाच्या घटनेनंतर ट्रेन व्यवस्थापकाने सकाळी ८.५५ वाजता सहाय्यक इंजिनाची मागणी केली. त्यानुसार कर्जत येथून सहाय्यक इंजिन सकाळी ९.२५ वाजता रवाना करण्यात आले. हे इंजिन सकाळी १०.०५ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बिघडेल्या रेल्वेगाडीला सहाय्यक इंजिन जोडून सकाळी १०.१७ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.