एकनाथ शिंदे यांची ग्वाही; तीन वर्षांत शून्य मृत्यू महामार्ग बनविण्याचे लक्ष्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात होणारे प्रवाशांचे मृत्यू हे चित्र लवकरच बदलणार आहे. या महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच अपघाताची संख्या कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. यातून येत्या तीन-चार वर्षांत हा महामार्ग शून्य अपघात मार्ग बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

या महामार्गावरील अपघातातील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मिहद्रा आणि मिहद्रा लिमिटेड, सेव्ह लाइफ फाऊंडेशन (बिगर सरकारी संस्था) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या संस्था एकत्रित सहकार्याने पुढील तीन-चार वर्षांत यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस-वेवरील अपघातातील मृत्यूंची संख्या शून्यपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलीस यंत्रणा, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर्स, डी.वाय. पाटील विद्यापीठ, ओगिल्वी, जे.पी. रिसर्च आणि एक्स्प्रेस-वेजवळील अनेक हॉस्पिटल्स यांचा एकत्रित सहभाग असणार आहे. एखादा अपघात झाल्यास त्यातील जखमींना त्वरित रुग्णालयांमध्ये पोहोचविणे, जनजागृती, वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात टाळण्यासाठी एमएसआरडीसीने सुरक्षाविषयक अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरडी कोसळून अपघात होऊ नयेत यासाठी अनेक ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे अपघातात वाहने उलटून प्राणहानी होऊ नये यासाठी ब्रुफेन वायर रोप्स लावण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.

अपघातानंतर रस्ता लवकर मोकळा होऊन  आवश्यक मदत मिळण्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आयआयटीच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एल. मोपलवार, महिंद्र आणि महिंद्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय राम नाक्रा, सेव्ह लाइफ फाऊंडेशनचे जयंत बांठिया आदी उपस्थित होते.

’ सेव्ह लाइफ फाऊंडेशन आणि मिहद्रा अँड मिहद्रा यांच्यासमवेत होत असलेल्या या सामंजस्य करारामुळे द्रुतगती महामार्ग ‘झिरो फेटॅलिटी कॉरिडॉर’ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune expressway accident issue
First published on: 24-02-2016 at 06:04 IST