मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणारे साडेसहा हजार वाहनचालक कारवाईच्या फेऱ्यात; वेगमर्यादा, सीटबेल्ट नियमाचे उल्लंघन

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा आणि सीटबेल्टबाबतच्या नियमांचे वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होत असून या प्रकाराची गंभीर दखल घेत महामार्ग पोलिसांनी १७ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात या मार्गावर विशेष कारवाई केली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणारे साडेसहा हजार वाहनचालक कारवाईच्या फेऱ्यात; वेगमर्यादा, सीटबेल्ट नियमाचे उल्लंघन
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा आणि सीटबेल्टबाबतच्या नियमांचे वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होत असून या प्रकाराची गंभीर दखल घेत महामार्ग पोलिसांनी १७ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात या मार्गावर विशेष कारवाई केली. या दोन्ही गुन्ह्यांत एकूण साडेसहा हजारांहून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली  असून त्यात वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची संख्या अधिक आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घाटात वाहनांसाठी प्रतितास ५० किलोमीटर आणि अन्य ठिकाणी प्रतितास १०० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आणखी पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांविरोधात द्रुतगती मार्गावर असलेल्या इंटरसेप्टर वाहनांवरील सीसी टीव्ही तसेच स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. याविरोधात १७ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. बोरघाट, पळस्पे जवळील खालापूर टोल प्लाझा, वडगाव येथे कारवाई करण्यात आली. बोरघाटात वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. येथे तीन हजार ८५३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या तीनही परिसरात एकूण चार हजार ७७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

चारचाकी तसेच अन्य वाहन चालविताना चालकांनी सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. मात्र बहुसंख्य चालक या नियमाकडे काणाडोळा करतात. अशा वाहनचालकांना हेरून महामार्ग पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या तिन्ही परिसरात केलेल्या कारवाईत पळस्पेजवळील खालापूर टोल प्लाझाजवळ सर्वाधिक म्हणजे दोन हजार १५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ वडगाव जवळ ४४२ वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

वाहतूक नियम मोडणाऱ्या या सर्व वाहनचालकांवर केलेल्या कारवाईतून ५७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर अद्याप ८३ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड वसूल होणे बाकी आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबईला पावसाने झोडपले; आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी