मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर कंत्राटदार काही किरकोळ कामे करीत आहे. या कामादरम्यान एका क्रेनचालकाने क्रेन सुरू असताना रिल बनविल्याची बाब निदर्शनास आली. रिल बनविताना क्रेनचालकाकडून एखादी चूक झाली असती तर क्रेनवर काम करणाऱ्या कामगारांसह बाजूने जाणाऱ्या वाहनांतील प्रवासी-वाहनचालकांच्या जीवावर बेतले असते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित क्रेनचालकाला तातडीने बडतर्फ करावे, असे आदेश एमएसआरडीसीने कंत्राटदाराला दिले आहेत.

कारवाईनंतरही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच

मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करणारा मिसिंग लिंक नुकताच वाहतूक सेवेत दाखल झाला. डोंगरदऱ्यांतून आणि तलावाखालून जाणाऱ्या, जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाची भुरळ सर्वसामान्य, राजकारणी, कलाकारांसह सर्वांनाच पडत आहे. त्यामुळे या मिसिंग लिंकवरून प्रवास करताना रिल्स बनविणे, छायाचित्र, चित्रफित काढणे असे प्रकार सुरूच आहेत. महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू असल्याने हे प्रकार कमी होत आहेत, मात्र पूर्णपणे बंद झालेले नाहीत. आता या प्रकल्पाच्या कामादरम्यान क्रेनचालकानेच जीवघेणा रिल बनविल्याची बाब निदर्शनास आली आहे.

जगातील सर्वात उंच, १८० मीटर उंच अशा केबल स्टेड पुलावर एएफकॉन्स कंपनीकडून काही किरकोळ कामे सुरू आहेत. पुलावर क्रेन होती आणि क्रेनच्या ट्रॉलीमध्ये चार ते पाच कामगार होते आणि ते काम करत होते. काम सुरू असताना क्रेनचालकाने संपूर्ण लक्ष क्रेनकडे देणे गरजेचे होते. कारण खाली खोल दरी होती आणि आजूबाजूने मोठ्या संख्येने वाहने धावत होती. अशावेळी क्रेनचालक मोबाइलवर रिल बनविण्यात व्यग्र होता.

कंत्राटदाराकडून होणार कारवाई

रिल बनविताना त्याचा क्रेनवरील ताबा गेला असता वा कोणतीही चूक झाली असती तर ट्रॉलीतील कामगारांसह मिसिंग लिंकवरून धावणाऱ्या वाहनांतील प्रवासी-वाहनचालकांचा जीव धोक्यात आला असता. ही रिल प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याची गंभीर दखल घेतल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. क्रेनचालकाच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे या क्रेनचालकाविरोधात कडक कारवाई करण्याचे, त्याला बडतर्फ करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर एमएसआरडीसीच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे कंत्राटदार कंपनीकडून सांगण्यात आले.