मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी विविध कारणे देत मिसिंग लिंक(कनेक्टिंग लिंक) हा महत्वकांक्षी प्रकल्प फाईलबंद केला. महायुतीच्या सरकारने हाच प्रकल्प पूर्ण करण्याची हिंमत दाखविली. पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे या प्रकल्पाला कोणताही धोका पोहचलेला नसून आयआयटीच्या अहवालानुसार या ठिकाणी दरडी कोसळू नयेत म्हणून व्यापक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
‘आम्हाला शिव्या देणारे दहा वर्षांनी दिसणारही नाहीत. पण कनेक्टिंग लिंक त्याच जागी कायम असेल असे सांगत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांबाबत सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सूटली असून हा घाट अपघातमुक्त झाला आहे. कोकण रेल्वेही शक्य नाही म्हणून अनेकांनी विरोध केला होता. मात्र माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांनी हिमंत दाखविल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला. या मार्गावरही सुरुवातीची १५ वर्षे दरडी कोसळण्याच्या अडचणी येत होत्या. आता हा मार्ग सर्वाधिक उपयुक्त असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्पाबाबतही महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून, १४ कारणे सांगून मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीने फाईल बंद केली होती. आम्ही हिंमत दाखवून जगातला सगळ्यात मोठा बोगदा करुन दाखविला याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
कनेक्टिंग लिंक प्रकल्प हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतिक असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा, भारतातील सर्वाधिक उंच व्हायाडक्ट आणि सर्वाधिक उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. अतिवृष्टीत त्या ठिकाणी दरड कोसळली मात्र त्यामुळे बोगद्याला कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट दरड हटवून १८ तासात वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मिसिंग लिंकबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांनी काही उपाययोजना सूचविल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी दरडी कोसळून नयेत तसेच बोगद्याला अधिक सुरक्षितता आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या बोगद्यामुळे सुखरुप राहिल्याचे अनेक प्रवाशी सांगत असताना काही मंडळी समाज माध्यमातून या प्रकल्प आणि सरकारची बदनामी करीत आहेत. आम्हाला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
पालघर, वसई-विरारमध्ये गंभीर परिस्थिती
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस होत असला तरी अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात विशेषत: वसई-विरारची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे ससत पाऊस पडत असून गेल्या ७२ तसांत तब्बल ७६२ मिलिमीटर पाऊस त्या भागात पडला आहे. तेथील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून लोकांना मदत केली जात आहे.
मोबाईल नेटवर्क आणि वीज व्यवस्था कोलमडून पडली असून सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून मोबाईल नेटवर्क सुरु करण्यावर भर दिला जात आहे. तसेच वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले अल्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला असून लोकांच्या मदतीसाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
