मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना मिसिंग लिंकवर तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यामुळे हलकी वाहने, हलकी व्यावसायिक वाहने, बस आणि एसटी यांचा प्रवासाचा कालावधी अर्ध्यातासाने कमी होणार आहे. मिसिंग लिंकचे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीकडून १३.३ किमीच्या मिसिंग लिंकचे काम २०१९ मध्ये हाती घेण्यात आले. ६६९५.३७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. शुक्रवारी, १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
लोकार्पणानंतर काही तासांनी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. ही मार्गिका खुली झाल्यास घाटातील प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटांत खोपोलीवरून कुसगावला येता येणार आहे. मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर नेमकी कोणती वाहने यावरून धावू शकणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. याविषयी एमएसआरडीसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता चारचाकी हलकी वाहने, हलकी व्यावसायिक वाहने, बस, मिनी बस आणि एसटी अशा वाहनांना प्रवेश असेल. तर स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना कायमस्वरूपी बंदी या मार्गिकेवर असणार आहे. अवजड वाहनांना (मालवाहतूक) ही तात्पुरता तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला सांगितले.
मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रतिसाद पाहिला जाईल, सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर अवजड वाहनांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा अवजड वाहनांच्या प्रवेशासंबंधी सहा महिन्यांनंतर निर्णय होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली प्रकल्पाची पाहणी
मिसिंग लिंक प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी या प्रकल्पाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी कुसगाव ते खोपोली असा मिसिंग लिंक प्रवास केला. तर एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सारथ्य केले. दरम्यान या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास ६ किमीने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहेच, पण त्याचवेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा प्रकल्प ठरेल, असे यावेळी शिंदे म्हणाले. जगातील सर्वात रुंद, २३.७५ मीटरचा बोगदा या प्रकल्पात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही या प्रकल्पाची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तर १ मे ला मिसिंग लिंकचे लोकार्पण होईल, असे यावेळी शिंदे यांनी जाहीर केले.
