मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ हा पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशासाठी महत्त्वाचा ठरणार असून प्रवासाच्या वेळेतील कपात आणि घरखरेदीदारांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्जत, नेरळ आणि लोणावळा आदी परिसरातील मालमत्तांच्या दरात तीन ते पाच टक्के वाढ होईल, असा दावा विकासकांनी केला आहे.
नेरळ आणि कर्जतसारख्या परिसरांना सध्या प्रचंड मागणी आहे. अनेक बडे विकासक या परिसरात वसाहत उभी करीत आहेत. मुंबईजवळ सेवानिवृत्तीनंतर घर हवे, ही संकल्पना सध्या घरखरेदीदारांना खुणावत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे नेरळ-कर्जत तसेच लोणावळ्याजवळील परिसर पुणेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे. पुणेस्थित विकासक तसेच घरखरेदीदारांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
मुंबई आणि नवी मुंबईच्या तुलनेत घरांच्या कमी किमती आणि वाढत्या जीवनशैलीमुळे नेरळ, कर्जत, खोपोली आणि लोणावळा ही ठिकाणे स्थावर संपदा वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मुंबईचा शहरी विस्तार वाढत असताना, ‘मिसिंग लिंक’ हा केवळ अंतर कमी करणारा दुवा नसून शाश्वत आणि विखुरलेल्या शहरी विकासासाठी नवीन दारे उघडणारा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला आहे, असे प्रतिपादन हिरानंदानी समुहाचे प्रमुख व नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. निरंजन हिरानंदानी यांनी केले आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प घाट विभागाला वळसा घालून मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे २०-२५ मिनिटांनी कमी करणार आहे. यामुळे फक्त देशातील सर्वात व्यस्त एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार नाही तर या कॉरिडॉरमधील स्थावर संपदेचे नवे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार गजबजलेल्या शहराबाहेर पर्याय शोधण्यास प्रवृत्त होतील, असा दावा नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष कमलेश ठाकूर यांनी केला आहे.
पायाभूत सुविधा उत्प्रेरक म्हणून काम करत असल्याने, कर्जत आणि जवळच्या भागात छोटे भूखंड, बंगले वा व्हिला आणि आरोग्यविषयक निवासी वसाहतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे. या प्रकल्पामुळे कर्जत आणि परिसरातील आणखी काही नवी ठिकाणे उदयाला येणार आहेत. प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे भूखंड विकास आणि उच्च जीवनशैलीवर आधारित घरांच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. आजचे घर खरेदीदार वेळेतील बचत आणि जीवनमानाचा दर्जा यांत समतोल शोधत आहेत. कर्जतसारखी ठिकाणे ही मागणी पुरी करीत आहेत. पायाभूत सुविधांमधील बदल मुंबईला उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास ओरा समुहाच्या संचालिका उन्नती वर्मा यांनी व्यक्त केला.
