Mumbai-Pune Expressway Missing Link Project: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आणखी जलद करण्यासाठी २०१० मध्ये मिसिंग लिंकची संकल्पना मांडली. पण तत्कालीन काँग्रेस सरकारने एक नव्हे १३ कारणे देत प्रकल्प बासनात गुंडाळा. हा प्रकल्प आव्हानात्मक असून तो करणे अशक्यप्राय असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण आमचे सरकार आले आणि आम्ही हे आव्हान पेलत मिसिंग लिंक करून दाखवली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास अतिजलद होणार असून या प्रकल्पाला मिसिंग लिंक नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधावे. या मार्गिकेला लवकरच नाव देण्यात येईल. पण मिसिंग लिंक हे नाव बदलून कनेक्टिंग लिंक करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) केली.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज सव्वा लाखांहून अधिक वाहने धावतात. यात भविष्यात आणखी वाढ होणार आहे. हा महामार्ग सध्या वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी १३.३ किमीचा मिसिंग लिंक प्रकल्प २०१९ मध्ये हाती घेण्यात आला. ६६९५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी, महाराष्ट्र दिनी या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले. लोकार्पणानंतर काही तासातच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्यावरून वाहने धावू लागली. मिसिंग लिंकचे भूमिपूजन आणि लोकार्पण आपल्याच काळात होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. मिसिंग लिंक प्रकल्पावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

मिसिंग लिंकची संकल्पना २०१० मध्ये मांडली होती. यासंबंधीचा अहवाल तयार करून तो सरकारसमोर ठेवण्यात आला. मात्र तब्बल १३ कारणे देत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची फाईल बंद केली, प्रकल्प गुंडाळला. लोणावळ्याच्या तलावाखालून मार्गिका नेणे शक्य नसल्याचे त्या सरकारकडून सांगण्यात आले. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला, अधिकाऱ्यांना बोलावले, अहवाल तपासला आणि आव्हानात्मक प्रकल्पाचे काम हाती घेतला. अत्यंत आव्हानात्मक असे हे काम आम्ही पूर्ण करून दाखवले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँगेसवर टीका केली.

मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नाव काय द्यायचे हे लवकरच ठरवू. मात्र हा प्रकल्प मिसिंग लिंक नव्हे, तर कनेक्टिंग लिंक आहे. यापुढे हा मार्ग कनेक्टिंग लिंक म्हणूनच ओळखला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, जगातील सर्वात रूंद बोगदा म्हणून मिसिंग लिंकवरील दोन बोगद्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हा प्रकल्प अभियांत्रिकी आव्हान होते. सोसाट्याचा वारा वाहत असताना काम करणे अत्यंत कठीण होते. मात्र एमएसआरडीसीने आणि कंत्राटदारांनी हे आव्हान पेलले, प्रकल्प पूर्ण केला, असे सांगत त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांचे कौतुक केले.

राज्यात निसर्ग वादळ आले आणि त्याने हाहाःकार उडवला. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १५५ किमी होता. पण २४० किमी वेगाने वारे वाहू लागला तरी तो झेलू शकेल अशा पद्धतीने मिसिंग लिंकवरील केबल स्टेड पूल बांधण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पासाठी भारतासह सात देशाचे सहकार्य लाभले. आव्हानात्मक काम ज्यांच्यामुळे पूर्ण झाला त्या कामगारांचे आभार मानत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सुप्रियाताई यापुढे तुम्हाला वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही – मुख्यमंत्री

शुक्रवारी मिसिंग लिंकच्या लोकार्पणाच्या दिवशी सकाळी खासदार सुप्रिया सुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्याचा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. पण सुप्रियाताई महामार्गावर अडकण्याची ही शेवटची वेळ. यापुढे महामार्गावर वाहतूक कोंडीत तुम्ही कधीच अडकणार नाही याची मी खात्री देतो. कारण तुमच्या सरकारने जो प्रकल्प गुंडाळा तो प्रकल्प आम्ही आज सेवेत दाखल करत आहोत. या लिंकमुळे आता तुम्ही सुसाट प्रवास कराल.

मिसिंग लिंकवर मुख्यमंत्र्यांनी चालवली गाडी

मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर खोपोली – कुसगाव असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवून केला. यावेळी त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. तर गाडीत मागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड होते. मिसिंग लिंकवरील प्रवासाचा अनुभव सांगताना त्यांनी वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याची सूचना केली.

प्रगती आणि विकासाची ही कनेक्टिग लिंक आहे. जे होणार नाही ते आम्ही करून दाखवले. ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन आम्ही केले त्याच प्रकल्पाचे लोकार्पण आम्ही करत आहोत याचा आनंद आहे. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मिसिंग लिंक प्रकल्प आज सेवेत दाखल होत आहे ही बाब आनंदाची आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजित पवार या प्रकल्पाचा नियमित पाठपुरावा करत होते. कामाची पाहणी करत होते, असे अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या.

मिसिंग लिंक वैशिष्ट्य

-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रवास अतिजलद आणि सुरक्षित करण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प उभारला.-प्रकल्पाची एकूण लांबी – १९.८४ किमी

– खोपोली – कुसगाव मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंकची लांबी १३.३ किमी-खालापूर – खोपोलीदरम्यान ५.८६ किमीच्या रस्त्याचे आठ पदरीकरण-रस्त्याची रुंदी-१०० मीटर

-मोठे पूल-४-लहान पूल-१

-बोगदे-२-व्हायाडक्ट-२

-केबल स्टेड ब्रिज – मुख्य स्पॅन ३०५ मीटर-रुंदीकरण – ५.८३ किमी

-उन्नत मार्ग- १-भूयारी मार्ग (वाहन)- २

-भूयारी मार्ग (पशु)- २-कलव्हर्ट -११ वाहिनी, २ बॉक्स

-प्रकल्पाचा एकूण खर्च – ६६९५.३७कोटी रुपये-एकूण भूसंपादन – १२८.०२९५हेक्टर

-वन जमीन – ७४.७१०२ हेक्टर-प्रकल्पास मान्यता – २०१८

-दोन टप्प्यात काम – पहिल्या टप्प्याचा कंत्राटदार नवयुग इंजिनीअरिंग, दुसऱ्या टप्प्याचा कंत्राटदार एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर

– टायगर व्हॅलीवर जमिनीपासून सुमारे -१३२ फूट उंचीवर हा भव्य केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. हा पूल ७० किमी प्रतितास वेगाचे वारे आणि मुसळधार पाऊस झेलण्यास सक्षम. हा पूल देशातील जमिनीवरचा सर्वात उंच पूल ठरला आहे.- विशेष म्हणजे मिसिंग लिंक लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून जातो, जे आधुनिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.

– या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ साधारण अर्धा तास (३० मिनिटे) कमी होणार आहे. सहा किमीने प्रवास कमी होणार आहे.

जगातील सर्वांत रुंद बोगदेया प्रकल्पात दोन बोगदे असून हे बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत. यातील पहिला बोगदा १.७५ किमी, तर दुसरा बोगदा ८.९२ किमी लांबीचा आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे.