मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बांधलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. लोकार्पणानंतर काही तासांनी मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल केली जाणार असून हा प्रकल्प सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवास अतिजलद होणार आहे. प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश असून हे बोगदे जगातील सर्वात रुंद, २३.७५ मीटरचे बोगदे आहेत. जगातील सर्वात रुंद बोगद्यामधून शुक्रवारी प्रवास सुरू होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आजघडीला राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहनांसाठी अपुरा पडत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अपघातांचीही भीती वाढली आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने महामार्गाच्या रुंदीकरणासह महामार्गाच्या सुधारीकरणाचा निर्णय घेतला. सुधारीकरणाअंतर्गत खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे काम २०१९ मध्ये हाती घेण्यात आले होते.

खोपोली – कुसगाव मार्गिका मिसिंग लिंक म्हणून ओळखली जात असून या मार्गिकेचे काम आता पूर्ण झाले आहे. ६,६६९.३७ कोटी रुपये खर्चाची ही मार्गिका २०२१ मध्येच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या प्रकल्पाला विलंब झाला. आता ही मार्गिका पूर्ण झाली असून ही मार्गिका शुक्रवारी सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १२ वाजता मिसिंग लिंकचे लोकार्पण होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गातील मिसिंग लिंकवरील पूल क्रमांक १, खोपोली एक्झिटजवळ लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

लोकार्पणाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही तासांनी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. ही मार्गिका खुली झाल्यास वाहनांना घाटातील प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटांत खोपोली – कुसगाव प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. दरम्यान, या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना आणि प्रवासी वाहनांना कायमस्वरूपी प्रवेश असणार आहे. तर मालवाहू वाहनांना प्रवेश देण्यासंबंधी नोव्हेंबरमध्ये निर्णय होणार आहे. तर स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना या मार्गावर कायमस्वरूपी बंदी असणार आहे. त्यामुळे मिसिंग लिंकवरील प्रवास सुरक्षितही मानला जात आहे. या मार्गिकेवरून चारचाकी वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी चमत्कार (इंजिनियरिंग मार्व्हल) मानला जात असून यातील दोन बोगदे जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे. या दाव्याच्या अनुषंगाने या बोगद्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्रक्रिया एमएसआरडीसीकडून सुरू आहे.