मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून लोकार्पणानंतर काही तासांनी ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी सोमवारी मिसिंग लिंकवरील वाहतुकीबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार हलक्या चारचाकी वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी मिसिंग लिंकवर १ मेपासून हलकी वाहने, बस, प्रवासी वाहनांना प्रवेश असणार आहे. तर मालवाहू वाहनांना तात्पुरते मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी असणार असून या वाहनांना प्रवेश देण्याबाबत नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रवास अतिजलद होणार

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अतिजलद आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खोपोली ते कुसगाव अशी नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधली. या मिसिंग लिंकचे काम आता पूर्ण झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत १ मे रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर काही तासांनी ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे वाहनचालक – प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या मिसिंग लिंकवरील वाहतूक व्यवस्थापनाबाबतची अधिसूचना सोमवारी वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली.

‘या’ वाहनांना कायमस्वरूपी बंदी

अधिसूचनेनुसार १ मेपासून हलकी वाहने, बस, प्रवासी वाहने यांना मिसिंग लिंकवर प्रवेश असणार आहे. तर मालवाहतुकीला तात्पुरती बंदी असणार आहे. मालवाहू वाहनांना प्रवेश देण्यासंबंधी सहा महिने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्वलनशील पदार्थ

आणि स्फोटके वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवर कायमस्वरूपी बंदी असणार आहे. अशा वाहनांना घाटातूनच प्रवास करावा लागणार असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अधिसूचनेत वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. मिसिंग लिंकवर हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी अशी वेगमर्यादा असणार आहे. ही वेगमर्यादा पाळणे वाहनचालकांना बंधनकारक आहे.