मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी सकाळी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे, तसेच बांधकामाला कोणताही धक्का बसला नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सांगितले जात आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत आणि कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता मिसिंग लिंकची आयआयटीच्या तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. अतिवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे बांधकामाला धक्का बसला आहे का, तसेच बांधकाम सुरक्षित आहे का, याची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक डोंगरदऱ्यांतून जातो. त्यामुळे येथे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन महामार्गावरील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच मिसिंग लिंकवरील दरडप्रवण क्षेत्रातही ५० मीटरपर्यंत संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, सोमवारी अंदाजे २०० मीटर उंचावरून दरड पुलावरील बोगद्याच्या प्रवेशद्वारावर कोसळली. त्यामुळे प्रवेशद्वाराचा काही भागही कोसळला. या दुर्घटनेनंतर मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्याची चर्चा होती.
मात्र, मिसिंग लिंकचा स्लॅब किंवा कोणताही संरचनात्मक भाग कोसळला नसल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे. तसेच मिसिंग लिंकच्या बांधकामालाही कोणताही धक्का बसला नसल्याचाही दावा एमएसआरडीसीने केला आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
सुरक्षेची तपासणी
मिसिंग लिंकवर नुकतेच खड्डे पडले होते, तर आता दरड कोसळली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची तपासणी आयआयटीच्या तज्ज्ञांकडून केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. पावसाने उघडीप दिल्यानंतर मिसिंग लिंकची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीत मिसिंग लिंकचे बांधकाम सुरक्षित आहे की नाही, त्याला कोणताही धक्का बसला आहे का, याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आयआयटीच्या तज्ज्ञांच्या तपासणीनंतर मिसिंग लिंक सुरक्षित आहे की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे ठप्प झाला आहे. सध्या अडकलेल्या गाड्या सुरक्षितपणे पुढे नेण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नव्याने वाहने महामार्गावर येऊ नयेत यासाठी आज कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय मुंबई-पुणे प्रवास करू नये असे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.
