मुंबई: दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने डोंगरातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात बदल झाला. या पाण्याबरोबर मोठया प्रमाणात दगड माती रस्त्यावर आली. या दुर्घटनेत मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यांना हानी झालेली नाही. या मार्गावरील सुशोभिकरणासाठी ठेवण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या दरड प्रवण भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर सांगितले.

रविवारपासून कोसळणाऱ्या पावसाने अर्धा राज्याचे जनजीवन विस्कळीत केले आहे. यंदा लोकार्पण करण्यात आलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळली. त्यामुळे विरोधकांकडून मोठया प्रमाणात टीका केली जात आहे. पहिल्याच पावसात मिसिंग लिंक मिस झाला अशी टीका केली गेली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या संपूर्ण महार्गाची पाहणी करताना दरड कोसळलेल्या ठिकाणी एमएसआरडीसीचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह दरड कोसळण्याची कारणे जाणून घेतली. या ठिकाणी डोंगरमाथ्यातून येणारे पाणी वाहून जाणाऱ्या नेहमीच्या मार्गापेक्षा दुसऱ्या मार्गाने पाणी खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या सुरू संततधार पावसामुळे तसेच काही काळ पाऊस थांबल्यानंतर दाट धुक्याने समोरचे काही दिसेनासे होते. या नैर्सगिक आपत्तीमुळे डोंगराच्या माथ्यावर नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे अचूक निरीक्षण करणे शक्य होत नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ञाकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येईल. पाण्याच्या प्रवाहात नेमका कशामुळे बदल झाला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचा निर्णय या अहवालानंतर घेतला जाईल, असे भोसले यांनी सांगितले.