मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन होऊन महिनाही पूर्ण झाला नसताना प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेवरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पातच अशी घटना घडणे गंभीर असल्याचे सांगत मिसिंग लिंकच्या संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी, लेखापरीक्षण (ऑडिट) आणि संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य अंबादास दानवे यांनी मिसिंग लींग सह पावसाच्या घडलेल्या दुर्घटनांबाबत २८९ प्रस्तावांतर्गत चर्चेची मागणी केली. यावेळी सतेज पाटील, अनिल परब आणि भाई जगताप यांनी अनधिकृत इमारती, मुंबई – पुणे महामार्गाची स्थिती, झाडे पाडण्याच्या घटना यावरून सरकारला धारेवर धरले.पाऊस हा नैसर्गिक असला तरी अनेक दुर्घटना या मानवनिर्मित असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
मिसिंग लिंक, कोस्टल रोड, झाडे कोसळण्याच्या घटना, मानखुर्दमधील दुर्घटना आणि मुंबईतील पायाभूत सुविधांमधील त्रुटी यासाठी सरकार आणि प्रशासन जबाबदार असल्याचे विरोधकांनी सभागृहात म्हटले. कोस्टल रोडच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित करत त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांवरून मुंबई महापालिकेच्या दाव्यांवरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आयएमडीचा इशारा असूनही पूर्वतयारी का झाली नाही?
भारतीय हवामान विभागाने (IMD) ३ जुलैलाच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानंतरही दरडप्रवण भागांची तपासणी, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन यंत्रणा प्रभावीपणे तैनात करण्यात आल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा देशातील महत्त्वाचा मार्ग असताना सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
मिसिंग लिंकच्या कामा त्रुटी आढळल्यास कंत्राट दरावर कारवाई – गिरीश महाजन
सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर शासनाचे सातत्याने लक्ष असल्याचे सांगण्यात आले. मिसिंग लिंक परिसरातील दरड कोसळण्याच्या घटनेची तांत्रिक तपासणी करण्यात येईल. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिले .
राज्यात मुंबई, रायगड, पालघर आणि कोकणातील काही भागांत गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. यामध्ये कालच्या सहा मृत्यूंचाही समावेश असून, दुर्घटनाग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आली.
पावसामुळे आणि वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून, दरवर्षी साधारण ७०० ते ७५० झाडे पडत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांतच सुमारे ३०० ते ३५० झाडे कोसळल्याचे नमूद करत, आज आणि उद्या रेड अलर्ट असल्याने आणखी झाडे पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेला धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहितीही सरकारने दिली.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे कामकाज तहकूब
दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या अतिवृष्टीची गंभीर दखल घेत आणि भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या पुढील काही तासांतील अतिवृष्टी व ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची भावना लक्षात घेऊन विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. सभापतींनी जाहीर केले की, राज्यातील पावसाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता विधान परिषदेची नियमित बैठक मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा भरविण्यात येईल.
