मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सोमवारी पहाटे दरड कोसळली. या दुर्घटनेत दुसऱ्या क्रमांकाच्या बोगद्याच्या कमानीचा भाग कोसळून त्यावरील दरड पुलावर पडली. त्यामुळे तातडीने मिसिंग लिंकवरील ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करून दरड हटविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पथकाने हाती घेतले.

सुरुवातीला हे काम पुढील पाच तासांत पूर्ण होईल आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे एमएसआरडीसीकडून सकाळी ९ वाजता सांगण्यात आले होते. मात्र, दरड हटविण्यास तब्बल १४ तासांहून अधिक कालावधी लागला. त्यानंतर तांत्रिक व सुरक्षा तपासणी पूर्ण करून पुण्याहून मुंबईकडे जाणारी ही मार्गिका रात्री १० वाजल्यानंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे आता मिसिंग लिंकवरील दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.

मिसिंग लिंकच्या दुसऱ्या बोगद्याच्या कमानीवर उंचावरील उतारावरून सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरड कोसळली. अतिवृष्टीचा फटका मिसिंग लिंक प्रकल्पाला बसला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दगड, माती, पाणी, चिखल तसेच कमानीचा मोठा भाग पडल्याने ही मार्गिका तातडीने बंद करण्यात आली. मुंबईहून पुण्याकडे जाणारी दुसरी मार्गिका सकाळी साडेनऊच्या सुमारास वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान, बंद मार्गिकेवरील दरड हटविण्याचे काम सुरूच होते. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी नऊच्या सुमारास पुढील पाच तासांत दरड हटवून मार्गिका खुली करण्यात येईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि कमानीचा कोसळलेला भाग कापून हटविण्यास बराच वेळ लागत असल्याने एमएसआरडीसीने दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दरडीचा सर्व भाग हटवून मार्गिका मोकळी करण्यात आली. त्यानंतर एमएसआरडीसीच्या पथकाने सुरक्षा व तांत्रिक तपासणी सुरू केली. तपासणीनंतर मार्गिका वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

मार्गिका सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून आता या मार्गिकेवरून वाहने सुरळीत धावत असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. दरडीचा भाग हटवून मिसिंग लिंक पूर्णपणे वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यास तब्बल १९ तासांचा कालावधी लागला.