मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे दरड कोसळली. त्यानंतर पुण्याहून मुंबईला जाणारी मार्गिका तब्बल १९ तास बंद होती. सोमवारी रात्री १० वाजल्यानंतर ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र, सध्या या मार्गिकेवरून अंशतः वाहतूक सुरू आहे. दरड कोसळलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी पडत असल्याने या मार्गिकेवरील चार मार्गिकांपैकी केवळ दोनच मार्गिकांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. उर्वरित दोन मार्गिका वाहतुकीसाठी बंद आहेत.
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरील चारही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल आहेत. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सध्या मिसिंग लिंकवर वेगमर्यादेचे बंधन घातले आहे. तसेच नियमावलीही जाहीर केली आहे.
मिसिंग लिंकवरील बोगदा क्रमांक २च्या प्रवेशद्वारावर सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास दरड कोसळली. दरड प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर पडल्याने कमानही ढासळली. जवळपास १०० टन ढिगारा पुलावर पडला. दरड दुर्घटनेनंतर मिसिंग लिंक वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आली. त्यानंतर सुरक्षिततेची खात्री करून अडकलेली वाहने सोडण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता मुंबईहून पुण्याला जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर पुण्याहून मुंबईला येण्यासाठी वाहनांना घाटातील रस्त्याचा तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. हे काम सायंकाळी ६च्या सुमारास पूर्ण झाले. ढिगारा हटविल्यानंतर मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याऐवजी बोगदा आणि पुलाची सुरक्षा व तांत्रिक तपासणी करून रात्री १०.१० च्या सुमारास मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी दिली.
रात्री उशिरा पुण्याकडून मुंबईला जाणारी मार्गिका सेवेत दाखल झाली असली, तरी चारपैकी केवळ दोनच मार्गिकांवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दरड पडलेल्या भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी गळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गिकेतील दोनच मार्गिका सेवेत दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मिसिंग लिंकवरून ताशी ८० ते १०० किमी वेगाने वाहने धावतात. मात्र, सध्या एमएसआरडीसीने वेगमर्यादेचे बंधन घातले आहे. त्यानुसार पुलावर ताशी ४० किमी, तर बोगद्यात ताशी १०० किमी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय शिस्त पाळणे, काळजी घेणे, वेगमर्यादेचे पालन करणे तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्यासंबंधीची नियमावलीही एमएसआरडीसीने जाहीर केली आहे.
