मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरील दुसर्या बोगद्यालगत कोसळलेली दरड हटविण्याचे काम सोमवारी पहाटे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आले. हे काम दुपारपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर मिसिंग लिंकवरील वाहतूक सेवा पूर्ववत होईल असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत होते. मात्र दरड हटविण्यासाठी दुपारीचे साडे पाच वाजले. तर दरड हटविली तरी पावसाचा जोर आणि या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या मार्गिकेची सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुण्याहून मुंबईला जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. ही तपासणी केव्हा पूर्ण होईल याचे उत्तर नसल्याने तुर्तास तरी ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट रस्त्याचा तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा लागणार आहे.

सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरड कोसळली. दरडीचा भाग पुलावर कोसळलाच पण बोगद्याची कमाणही कोसळली. या घटनेची माहिती मिळताच एमएसआरडीसीच्या पथकाने मिसिंग लिंक पूर्ण बंद करून दरड हटविण्याचे काम हाती घेतले. महामार्गावर अडकलेली वाहने लक्षात घेता मुंबईहून पुण्याला जाणारी मार्गिका सकाळी नऊच्या सुमारास वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर दुसरीकडे दरड हटविण्याचे काम सुरु होते. हे काम पाच तासात पूर्ण होईल असे एमएसआरडीसीकडून सकाळी नऊ वाजता सांगण्यात आले होते. मात्र पावसाचा मारा, कमाणीचा भाग फोडून काढणे अवघड ठरत असल्याने या कामासाठी वेळ लागत होता. शेवटी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास दरड हटविण्यात एमएसआरडीसीच्या पथकाला यश आले. दरड हटविल्यानंतर मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल असे वाटत होते. मात्र सुरक्षिततेच्या कारणाने एमएसआरडीसीने ही मार्गिका बंदच ठेवण्याच निर्णय घेतला. तशी माहिती समाज माध्यमाद्वारे देण्यात आली.

पुण्याहून मुंबईला जाणार्या मार्गिकेची संपूर्ण सुरक्षा तसापणी,तांत्रिक तपासणी केल्यानंतर आणि या तपासणीत मार्गिका वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे खात्री झाल्यानंतरच मार्गिका वाहतूक सेवेत दाख केली जाणार असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले. पावसामुळे ही तपासणी करण्यास अडथळे येत आहेत, त्यामुळे या तपासणीसाठी किती वेळ लागणार हे आताच सांगता येणार नसल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे एक मार्गिका बंद असून ही मार्गिका केव्हा सुरु होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान प्रवाशांनी, नागरिकांनी गरज असेल तरच पुढील काही दिवस मुंबई-पुणे प्रवास करावा असे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.