मुंबई : बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अखेर आता अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे आता ९९ टक्के काम पूर्ण झाले असून सध्या रंगरंगोटीसह अंतर्गत कामांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन १ मे रोजी हा प्रकल्प सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. त्यामुळे १ मेपासून मुंबई ते पुणे प्रवास अतिजलद होणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात त्यात मोठी वाढ होणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून अपघातांचीही भीती वाढली आहे.

त्यामुळे महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात केली.

करारानुसार हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण होऊन ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कामाची गती आणि तांत्रिक अडचणींमुळे कामास विलंब झाल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २०२६ पर्यंत वाट पाहावी लागली आहे. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाचे ९९ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून आता रंगरंगोटीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

दरीखोऱ्यांतून जाणाऱ्या मार्गिकेतील खांबांना, केबल स्टेड पुलाच्या खांबांना निळ्या रंगाने रंगविण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. तर पुलासह बोगद्यातील अंतर्गत कामांनाही सुरुवात झाली असून एप्रिलअखेरीस सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे.

मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्याआधी आवश्यक त्या सुरक्षा तपासण्या करणे बंधनकारक आहे. यात किती भार पूल पेलू शकतो यासह अन्य प्रकारच्या तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्याही आता लवकरच सुरू केल्या जाणार असून या तपासण्यांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या घेण्यात येतील आणि १ मे रोजी मिसिंग लिंक सेवेत दाखल केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मिसिंग लिंक सेवेत दाखल झाल्यास महामार्गावरील घाटाचा प्रवास टळणार असल्याने प्रवासाचा वेळ 3० मिनिटांनी कमी होईल.