मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे शुक्रवारी लोकार्पण झाले. त्यानंतर हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रतिदिन धावणाऱ्या सरासरी १ लाख ३८ हजार वाहनांपैकी सुमारे एक लाख वाहने मिसिंग लिंकचा वापर करतील, असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला आहे. मिसिंग लिंकवरून हलकी वाहने, हलकी व्यावसायिक वाहने, बस आणि इतर प्रवासी वाहनांनाच प्रवेश आहे. त्यानुसार महामार्गावरून दररोज सुमारे एक लाख वाहने मिसिंग लिंकवरून धावतात.

एमएमआरडीसीने १३.३ किमी लांबीची खोपोली – कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधली. या मिसिंग लिंकचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून दुपारनंतर या मार्गावरून वाहने धावू लागली. वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेनुसार मिसिंग लिंकवरून हलकी वाहने, हलकी व्यावसायिक वाहने, बस, मिनी बस, एसटी आदी वाहनांना प्रवेश आहे.

तर मालवाहू वाहनांच्या (अवजड वाहने) प्रवेशाबाबत नोव्हेंबरमध्ये एमएसआरडीसी निर्णय घेणार आहे. तर स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना या मार्गिकेवरून कायमस्वरूपी प्रवेशबंदी असणार आहे. ही वाहने घाटातूनच प्रवास करतील. वाहतूक पोलिसांच्या, एमएसआरडीसीच्या या निर्णयानुसार मिसिंग लिंकवरून चारचारी, हलकी व्यावसायिक वाहने, बस, मिनी बस आणि एसटी धावू लागली आहे. त्यानुसार या मार्गिकेवरून दिवसाला एक लाख वाहने धावतील अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दिवसाला सरासरी १ लाख ३८ हजार ८४१ वाहने धावतात. यातील अंदाजे ७० टक्के वाहने चारचाकी, हलकी व्यावसायिक वाहने, बस, ट्र्क अशी असतील. याच वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश असणार आहे. ही वाहने शुक्रवारपासून मिसिंग लिंकवरून धावू लागली असून दिवसाला सुमारे एक लाख वाहने धावतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.