मुंबई : जागतिक स्तरावर गौरवला गेलेल्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या आणि मोठा गाजावाजा करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर (कनेक्टिंग लिंक) अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडले. देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलावर खड्डे पडल्याने आता प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मात्र, खड्डे किरकोळ स्वरूपाचे असून घाट भागात प्रचंड पाऊस पडत असल्याने छोटे खड्डे पडल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सांगण्यात येत आहे. तर खड्डे तातडीने बुजविण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी, महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास आणखी अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका बांधली. ही मार्गिका मिसिंग लिंक म्हणून ओळखली जाते. मोठा गाजावाजा करून या मिसिंग लिंकचे १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आणि त्यानंतर ही मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्यात आली. मिसिंग लिंक सेवेत दाखल झाल्यामुळे मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी झाला.

महत्त्वाचे म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवला गेला. या प्रकल्पातील दोन जुळ्या बोगद्यांची नोंद गिनीज बुकात जगातील सर्वांत रुंद बोगदे म्हणून झाली आहे. तर देशातील सर्वात उंच पूल म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पातील केबल स्टेड पूल ओळखला जाऊ लागला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून दऱ्याखोऱ्यांतून जाणारा पूल आणि बोगदा मजबूत व सुरक्षित असेल, यावर कामादरम्यान भर दिल्याचेही एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.

तसेच ऊन, वारा, मुसळधार पावसातही हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र मिसिंग लिंक सेवेत दाखल होऊन दोन महिने होत नाहीत, तोच मिसिंग लिंकवरील केबल स्टेड पुलाच्या सुरुवातीलाच खड्डे पडले आहेत. समाजमाध्यमावर एक चित्रफीत व्हायरल झाली असून या चित्रफितीत पुलावर खड्डे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे खड्डे बऱ्यापैकी मोठे असल्याचेही दिसत आहे.

ही चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर एमएसआरडीसीने तात्काळ खड्डे बुजवले. याविषयी एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी पुलावर खड्डे पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, हे खड्डे किरकोळ असल्याचे सांगितले. घाट परिसरात सर्वाधिक पाऊस होतो. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

त्यामुळे पुलावर किरकोळ खड्डे दिसत आहेत. हे खड्डे काही मिनिटांतच भरण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच जागतिक स्तरावर गौरवल्या गेलेल्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या प्रकल्पाच्या कामावर या खड्ड्यांमुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.