महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि अतिजलद करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन सात वर्षे झाली, पण अद्याप तो सेवेत दाखल झालेला नाही. त्यामुळे अतिजलद प्रवासाची प्रवासी – वाहनचालकांची प्रतीक्षा लांबली. आता मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. मिसिंग लिंक केव्हा सेवेत दाखल होणार आणि त्यामुळे प्रवास कसा अतिजलद होणार, याचा हा आढावा…

मिसिंग लिंक प्रकल्पाची गरज का?

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आज सर्वाधिक वर्दळीचा आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी सहा पदरी महामार्गावरून दिवसाला ५५ हजार वाहने धावत होती. पण आता यात मोठी वाढ झाली असून आता या महामार्गावरून दिवसाला ६५ हजार वाहने धावत आहेत. गर्दीच्या वेळी, सलग सुट्ट्यांच्या वेळी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या थेट एक लाखाच्या आसपास जाते. भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून हा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई – पुणे अंतर कमी झाले. हे अंतर आणखी कमी करून प्रवास अधिक सुसाट करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किलोमीटर लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली – कुसगावदरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी होणार आहे. या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात येत आहेत. यापैकी एक बोगदा १.७५ किलोमीटर, तर दुसरा ८.९२ किलोमीटर लांबीचा आहे. हा बोगदा २१.४२ मीटर रुंदीचा असून हा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असेल, असा दावा केला जात आहे. ८.९२ किलोमीटर लांबीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा ठरणार आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षेचा विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात येणार असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात येणार आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असेल. सुमारे ६,६९५.३७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. त्याचबरोबर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. कारण नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरड कोसळण्याची भीती दूर होणार आहे.

प्रकल्पास विलंब का?

मिसिंग लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात आणि वाऱ्याचा वेग अधिक असताना काम करणे शक्य होत नसल्याने कामास विलंब होत असल्याचेही एमएसआरडीसीकडून सातत्याने सांगितले जाते. त्यामुळेच या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीच्या अनेक तारखा चुकल्या. प्रकल्प पूर्णत्वासाठी डिसेंबर २०२२, जून २०२३, जानेवारी २०२४, मार्च २०२४, डिसेंबर २०२४ अशा अनेक तारखा देण्यात आल्या. तर त्यानंतरही २०२५ मधील अनेक तारखा पूर्णत्वासाठी देण्यात आल्या. पण आता मात्र प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत असून प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी नुकतीच नवीन तारीख देण्यात आली आहे.

१ मेपासून मिसिंग लिंक सेवेत?

मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्यास बराच विलंब झाला आहे. अनेक तारखा चुकल्या आहेत. पण आता मात्र या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत एमएसआरडीसीने मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्यासाठी महाराष्ट्र दिनाचा, १ मेचा मुहूर्त निवडला आहे. आता प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलांची, पुलांच्या खांबांची, बोगद्याची रंगरंगोटी आणि अंतर्गत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे एप्रिलअखेरीस पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. यादरम्यान प्रकल्पाच्या आवश्यक त्या चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. त्यानंतर १ मे रोजी मिसिंग लिंक सेवेत दाखल केली जाणार आहे. मिसिंग लिंक सेवेत दाखल झाल्यास द्रुतगती महामार्गावरील घाटाचा वळसा टळणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा अवधी वाचणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.